। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कचरा व्यवस्थापनाला गती देण्यासाठी नागरी सुविधा घटक योजनेंतर्गत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील 80 ग्रामपंचायतींना सीएनजीवर चालणार्या घंटागाड्या देऊन ओला आणि सुका कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प राबवला जाणार आहे. यामुळे दररोज 50 टनांहून अधिक कचर्याचे संकलन होण्याची अपेक्षा आहे.
ग्रामीण भागात प्लास्टिक कचर्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता, त्याचे संकलन आणि विल्हेवाट लावणे हे मोठे आव्हान ठरत आहे. यासाठी जनगणनेनुसार तीन हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या 80 ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत. या गावांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा करण्यासाठी घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या गाड्या एकावेळी 750 किलो कचरा वाहून नेऊ शकतात. कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी ओला कचरा नाडेप टाक्यांमध्ये कुजवून खत तयार केले जाणार आहे, तर सुका कचरा वर्गीकरण करून संबंधित कंपन्यांकडे पाठवला जाईल.
आतापर्यंत 50 ग्रामपंचायतींना या घंटागाड्या सुपूर्द करण्यात आल्या असून, उर्वरित गाड्यांचे वितरण लवकरच होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी दिली. या योजनेच्या माध्यमातून गावागावांतील स्वच्छता राखण्यासोबतच पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागेल. स्थानिक नागरिकांनी कचर्याचे वर्गीकरण करून या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.