बसस्थानकात सीएनजी पंप

अलिबागसह चार स्थानकांचा सहभाग; महानगर गॅसकडून उभारणार स्टेशन

| अलिबाग | प्रतिनिधी|

इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याला पर्याय म्हणून सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढला आहे. आता रायगड जिल्ह्यातील पाच एसटी बस आगारात महानगर गॅस स्टेशन उभारणार आहेत. त्या प्रकल्पाच्या कामाच्या कामाच्या हालचाली आगारात सुरु झाल्या आहेत. माती परीक्षणापासून संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील बसस्थानकात महानगर गॅस स्टेशन उभे राहणार आहे.

जिल्ह्यामध्ये कर्जत, पेण, महाड, अलिबाग व रोहा या एसटी बसस्थानकात महानगर गॅस स्टेशन उभारण्याचे नियोजन गेल्या सहा महिन्यांपासून सुरु होते. त्यानुसार जागेची पाहणीदेखील करण्यात आली होती. अखेर गॅस स्टेशन उभे करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

महाड, रोहा, पेण ही स्थानके महामार्गाजवळ आहेत. महामार्गावर प्रवास करताना गॅसची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी या तीन ठिकाणी महानगर गॅसचे स्टेशन बांधले जाणार आहे. तर खोपोली, खालापूर हा परिसर पुणे जिल्ह्याच्या जवळ असल्याने या ठिकाणीदेखील वाहनांची वर्दळ प्रचंड आहे. त्यामुळे कर्जतमध्ये गॅसचे स्टेशन बांधले जाणार आहे. तसेच अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. अलिबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे.

वाढत्या डिझेलच्या दराला पर्याय म्हणून या पाच बसस्थानकात महानगरचे गॅस स्टेशन बांधण्याचे काम सुरु झाले आहे. या गॅस स्टेशनमार्फत खासगी वाहनांनादेखील सेवा दिली जाणार आहे. तसेच एसटी महामंडळाच्या बसेसमध्येदेखील गॅस भरले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच गॅस स्टेशन उभे राहात असताना गॅसवर चालणाऱ्या बसेस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Exit mobile version