महाविद्यालयीन तरूणांनी जपली सामाजिक बांधिलकी

| चणेरा | प्रतिनिधी |

सुट्टीच्या दिवशी मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियामध्ये वेळ वाया घालवणाऱ्या आजच्या पिढीला आदर्श घालून देणारे काम रोह्यातील काही ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. रोहा शहरातील दहावी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत नदीकिनारी असलेला मॉर्निंग वॉक ट्रॅक स्वच्छ करून आपली सामाजिक जबाबदारी जपली आहे.

सत्यम राय, आर्यन पाटील, रौनक राजभर, साहिल रोकडे, श्रेय वरंडे, सुंदरम राय आणि इब्राहिम कासकर अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या ज्युनिअर कॉलेजला शिक्षण घेत आहेत, एकत्रितपणे फुटबॉल खेळणे हा त्यांचा छंद आहे. नेहमीप्रमाणे फुटबॉल खेळण्यासाठी एकत्र आलेल्या या मुलांचे लक्ष नदीकिनारी असलेल्या मॉर्निंग वॉक ट्रॅकवरील वाढलेल्या कचऱ्याकडे गेले. त्यानंतर सुट्टीचा दिवस सत्कारणी लावण्याचा निर्णय घेत या सर्वांनी हातात पोते आणि हातमोजे घेत संपूर्ण ट्रॅकवर आणि बाजूला पडलेला कचरा गोळा केला. या स्वच्छता मोहिमेत त्यांनी साधारणपणे एक ते दीड टन कचरा, प्लास्टिक, बाटल्या आणि इतर टाकाऊ वस्तू गोळा केल्या.

आम्ही काही विद्यार्थी नियमित फुटबॉल खेळतो, इथे कचरा पडलेला पाहून वाईट वाटायचे. म्हणून आम्हीच ठरवले की, कोणी येऊन साफ करेल याची वाट पाहण्यापेक्षा आपणच साफ करूया. हे शहर आपले आहे, ते स्वच्छ ठेवणे ही आपलीच जबाबदारी आहे.

सत्यम कृष्णा राय,
विद्यार्थी
Exit mobile version