। चिपळूण । वार्ताहर ।
गुहागरचे आ. भास्कर जाधव यांनी आपल्या मूळ गावी तुरंबव येथे शिमगोत्सवाला उपस्थित राहून शारदा देवी मंदिरात शारदा देवीची पालखी नाचविली. दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. आ. जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी देहभान विसरून ग्रामदेवता श्री शारदादेवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवताना दिसले. आपल्या ग्रामदेवतेवर प्रचंड श्रद्धा असलेले आ.जाधव हे काहीही झाले आणि कुठेही असले तरी नवरात्र उत्सवात शारदेच्या दरबारात पारंपरिक जाखडी नृत्य करण्यासाठी आणि शिमगोत्सवात पालखी नाचविण्यासाठी पोहोचतात. गावच्या सहाणेसमोर होम पेटवण्यात आल्यानंतर ग्रामस्थांसह ढोल-सनईच्या ठेक्यावर पालखी नाचविताना ते तल्लीन होऊन गेले होते. यावेळी त्यांचे बंधू सुनील जाधव, जि.प अध्यक्ष विक्रांत जाधव आणि पुतणे देखील सहभागी झाले होते.