| पनवेल | वार्ताहर |
दिवंगत बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि झेंडा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आगरी-कराडी कामोठा महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (दि.18) रोजी झाले. आगरी-कराडी कामोठा महोत्सवाचे हे बारावे वर्ष आहे. कामोठा या ठिकाणी या महोत्सवाचा दशकपूर्ती सोहळा असून हा महोत्सव म्हणजे कामोठ्यातील जत्राच असते. 27 नाव्हेंबरपर्यंत चालणारा हा महोत्सव कामोठे व परिसरातील नागरिकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.
कलाकारांचा नृत्याविष्कार, भव्य रंगमंच, आकाश पाळणे, खेळणी, खाद्यप्रेमींसाठी विविध खमंग खाद्यपदार्थांचे स्टॉल, दैनंदिन उपयुक्त वस्तूंची खरेदी असे बरेच काही या महोत्सवात आहे. या महोत्सवामध्ये स्थानिक मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. कामोठ्यातील मुलांसाठी कामोठा आयडॉल ही गायनाची स्पर्धा होणार आहे. पुरुषांसाठी ‘कामोठे श्री’ व महिलांसाठी ‘मिस कामोठे’ या सौंदर्यस्पर्धेचे आयोजनही केले आहे. तसेच धमाल कोळीगीते, महाराष्ट्राची लोकधारा, गौरव महाराष्ट्राचा ग्रुप डान्स व इतर भरगच्च कार्यक्रमांचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता येत आहेत. उद्घाटनप्रसंगी प्रथम कलामंचच्या कलाकारांनी सादर केलेल्या लावणी नृत्य व गाण्यांच्या कार्यक्रमला मोठी गर्दी केली होती.