सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
| सोगाव | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निमार्ण झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडेझुडपे व वाढलेले गवत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यामार्फत पावसानंतर काढण्यात येते. परंतु पावसाळा संपून बरेच दिवस झाले तरी काढण्यात आले नाही. परिणामी वाढलेली झाडेझुडपे वळणाच्या ठिकाणी समोरून येणारे वाहन दिसत नाही यामुळे वाहनचालकांना अपघाताची भिती वाटत आहे. या मार्गाने कनकेश्वर मंदिर, किहिम, आवास, सासवणे, मांडवा बीच आदी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. तसेच याच मार्गाने आर.सी.एफ. थळ कारखान्याकडे अनेक अवजड व ज्वलंत रसायने घेऊन वाहने जात असतात. त्यामुळे एखाद मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. तरी या मार्गावर वाढलेली झाडेझुडपे व गवत सार्वजनिक बांधकाम विभाग काढावे अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.