| अलिबाग | प्रतिनिधी |
मांडवा ते भाऊचा धक्का या यशस्वी रो-रो सेवेनंतर रेवस ते करंजा रो-रो सेवा लवकरच सुुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या सात महिन्यांपासून रेवस येथील प्रकल्पाचे काम थांबले होते. अखेर या कामाला मुहूर्त मिळाला असून, गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा नव्याने कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने दिली आहे. खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडीतून पर्यटकांसह प्रवाशांची सुटका करण्यासाठी रेवस ते करंजा रो-रो वरदान ठरणार आहे. केंद्राच्या सागरमाला योजनेंतर्गत रेवस व करंजा या ठिकाणी जेट्टी उभारणीपासून रस्ता, टर्मिनल, पार्किंग सेवा अशा अनेक सुविधा राबविल्या जाणार आहेत.
करंजा येथील जेट्टी, रस्ता, मच्छिमारांसाठी वेगळी जेट्टी, पार्किंग सेवा व इमारतीचे काम मे 2019 मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर रेवस जेट्टीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, निसर्ग चक्रीवादळासह तौक्ते चक्रीवादळ, लॉकडाऊन अशा अनेक कारणांमुळे या प्रकल्पाचे काम पुढे ढकलण्यात आले. रेवस येथील जेट्टीचे काम तांत्रिक कारणाबरोबरच ठेकेदार आजारी पडल्याने जानेवारीपासून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रखडले होते.
एक ऑक्टोबर 2020 पासून पुन्हा रेवस येथील कामांना सुरुवात करण्यात आली होती. जेट्टीवर येण्या-जाण्यासाठी काँक्रिट रस्ता तयार करण्यात आला. परंतु, काही तांत्रिक कारणाबरोबरच ठेेकेदार आजारी पडल्याने हे काम लांबणीवर गेले. जानेवारीपासून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रकल्पाचे काम थांबले होते. अखेर या कामाला पुन्हा मुहूर्त मिळाला आहे. रेवस जेट्टीच्या कामाला सुरुवात झाली असून, या कामाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीमध्ये 55 लाख रुपयांच्या निधीची वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नाव न टाकण्याच्या अटीवरून दिली आहे.
शेकापचा पाठपुरावा
शेकापच्या पाठपुराव्यामुळे रेवस-करंजा रो-रो प्रकल्प मार्गी लागणार आहे. यासंदर्भात माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात या प्रश्नाचा पाठपुरावा केला होता. त्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी सातत्याने या प्रश्नाला वाचा फोडत आहेत. मी आमदार असताना, रो-रो प्रकल्प सरकारने सुरु करावा यासाठी पाठपुरावा केला होता. माझ्या कारकीर्दीत हा प्रकल्प मंजूर करून घेतला होता. तो प्रकल्प आता मार्गी लागणार आहे, हे शेकापचे यश आहे, असे शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी सांगितले.
जलवाहतुकीचा मार्ग होणार सुखकर
रेवस ते करंजा रस्त्यावरील अंतर 86 कि.मी. असून, जलमार्गाने तीन किलोमीटर इतके आहे. रेवस ते करंजा रो-रो सेवा सुरु झाल्यास रेवस येथून करंजा येथे जाण्यासाठी प्रवासी व त्यांची वाहने बोटीने नेण्यास मदत होणार आहे. त्यामुळे इंधनाची व वेळेची बचत होणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक आहे. रेवस ते करंजामधील जलवाहतुकीचा मार्ग यामुळे अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे. करंजा-रेवस ते करंजा हा प्रवास रस्त्यावरून दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो. करंजा-रेवस रो-रो जलवाहतुकीमुळे वेळेबरोबरच पैशाची बचत होणार आहे. अवघ्या 20 मिनिटांत रेवस जेट्टीहून करंजा येथे पोहोचता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
ही आहेत कामे
सागरमाला योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून 50 टक्के व राज्य शासनाकडून 50 टक्के हिस्सा असणार आहे. या प्रकल्पाला 17 ऑक्टोबर 2018 रोजी तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली होती. रेवस येथील जेट्टी व अद्ययावत अशी टर्मिनल इमारत असणार आहे. या इमारतीमध्ये बुकिंग सेंटर, कँटीन, प्रतिक्षालय व अन्य सुविधा प्रवाशांसाठी असणार आहे. त्यात जेट्टीची लांबी 200 मीटर, जेट्टीची रुंदी 10 मीटर, जेट्टीकडे जाणारे सिमेंट काँक्रिटीकरण, 40 प्रवासी बसतील असे प्रतिक्षालय, तिकीट घर रो-रो जेट्टी बांधणे, परिसरात विद्युतीकरणाचे काम करणे.