मानसिक आरोग्य विषयक जनजागृती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
चिंता, नैराश्यामुळे एकलकोंडेपणा निर्माण होणे, आत्महत्या करणे अशा अनेक घटना घडण्याची भिती समाजात निर्माण झाली आहे. या मानसिक आजारापासून मुक्त करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम मानसोपचार विभागामाच्यावतीने मानसिक आरोग्य विषयक जनजागृती करण्यात आली. या निमित्ताने गेल्या आठ दिवसांपासून विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
आठ दिवसांच्या जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह निमित्ताने अलिबाग शहरात दि. 10 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत जनजागृतीपर प्रभातफेरी काढण्यात आली.पेण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य कसे जपावे, याबद्दल डॉ. अर्चना सिंह यांचे व्याख्यान घेण्यात आले. जिल्हा रूग्णालय अलिबाग येथील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. प्रथम तीन क्रमांक मिळविणार्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. बक्षीस वितरण अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी, डॉ. निशिकांत पाटील, डॉ. अमोल शिंदे, कार्यालय अधिक्षक राजेश किणी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
तसेच, थळ येथील आरसीएफ कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ’ताणतणाव व्यवस्थापन तंत्र’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अधिष्ठाता कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी ‘ताणतणाव व्यवस्थापन’ या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉ. अर्चना सिंह यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून मोलाचे मार्गदर्शन केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सहकार्याने मानसोपचार तज्ज्ञ तथा जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना सिंह, प्रफुल्ला कांबळे, धनेश्वरी कडू, विशाल दामोदरे, राजेश पवार, तेजश्री पाटील, काजल राठोड, मंगेश म्हात्रे, नवनाथ घरत, मानसोपचार विभागाचे सर्व कर्मचारी व जिल्हा रुग्णालय अलिबाग यांनी या कार्यक्रमांसाठी आणि सप्ताह यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.