। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग विधानसभा मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाली असून मतदान 20 नोव्हेंबर आणि मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार होणार आहे. निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी आचारसंहितेच्या काटेकोर व प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येणार असल्याची माहिती अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद बुधवारी (दि.16) घेतली होती. यावेळी ते बोलत होते.
यावेळी अलिबागचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी, अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, रेवदंड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले आदी उपस्थित होते. चव्हाण यांनी सांगितले की, 192 अलिबाग विधानसभा मतदार संघात तीन लाख तीन हजार 789 मतदार आहेत. त्यामध्ये 3 लाख 49 हजार 559 पुरुष व 1 लाख 54 हजार 230 महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदार संघातील 375 मतदान केंद्रांवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात अलिबागमध्ये 266, मुरूडमध्ये 72 व रोहामध्ये 37 केंद्र असून अलिबाग व मुरुडमध्ये प्रत्येकी एक अशी दोन केंद्राची वाढ झाली आहे. निवडणूक प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी राखीव कर्मचार्यांसह 1 हजार 967 कर्मचारी आहेत. यामध्ये 1 हजार 500 हून अधिक कर्मचार्यांची आवश्यकता आहे. शाळा, महाविद्यालय, आशा सेविका, बचत गट व इतर यंत्रणेमार्फत मतदान जनजागृती केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज 22 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत दाखल करणे, अर्जाची छाननी 30 ऑक्टोबरला, 4 नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती मुकेश चव्हाण यांनी दिली.
पुढे त्यांनी सांगितले की, 40 टक्केपेक्षा अधिक दिव्यांग मतदार व 80 वर्षावरील मतदारांना घरी मतदान करण्याची संधी उपलब्ध केली आहे. यासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत 12 ‘ड’ अर्ज भरण्यात येणार आहे. यानंतर अर्ज स्विकारला जाणार नाही. तसेच, त्यांना मतदान करता येणार नाही, असे ही ते म्हणाले.