साहा पत्रकार धमकी प्रकरणी चौकशी समिती

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचा विकेटकिपर वृद्धीमान साहाने काही दिवसांपूर्वी त्याला एका पत्रकाराने मुलाखत देण्यावरून धमकावले असल्याचा आरोप केला होता. सोशल मीडियावर पत्रकाराबरोबरचे चॅट शेअर करत वृद्धीमान साहाने नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणाची बीसीसीआयन गंभीर दखल घेतली असून चौकशीसाठी तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. या चौकशी समितीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, खजिनदार अरूण धुमल आणि वरिष्ठ काऊन्सिल मेंबर प्रभतेज सिंह भाटिया यांचा समावेश आहे. ही समिती पुढच्या आठवड्याच्या सुरूवातीला या प्रकरणाची चौकशी करण्याची शक्यता आहे.

वृद्धीमान साहा हा बीसीसीआयचा केंद्रीय करारात सामिल असलेला खेळाडू आहे. त्याने काही दिवसांपूर्वी ट्विट करून पत्रकाराने मुलाखतीसाठी धमकी दिल्याचा आरोप केला होता. यावेळी त्याने त्या पत्रकाराचे नाव जाहीर केले नव्हते. वृद्धीमान साहाने श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली,प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा यांच्याबरोबरचे वैयक्तिक संभाषण सार्वजनिक केले होते. यामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली होती. दरम्यान, साहाला पत्रकाराने धमकी दिल्याच्या प्रकरणावर भारताचे माजी खेळाडू रवी शास्त्री, पार्थिव पटेल आणि विरेंद्र सेहवाग यांनी कथित पत्रकारावर टीका केली होती. याचबरोबर भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या संघटनेने देखील या घटनेचा निषेध केला होता. आणि बीसीसीआयच्या याप्रकरणाची चौकशी करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यानंतर वृद्धीमान साहाने जरी बीसीसीआयने त्या पत्रकाराचे नाव विचारले तरी मी त्याचे नाव सांगणार नाही असा पवित्रा घेतला होता.

Exit mobile version