संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन

। माणगाव । प्रतिनिधी ।

मागील बारा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणार्‍या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत दर्जा व किमान वेतन देण्याच्या मागणीबाबत मुंबई येथील आझाद मैदानात 26 ऑगस्ट रोजी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच, या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून आंदोलनकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्‍वर मुंडे, उपाध्यक्ष मुकेश नामेवार, सचिव मयूर कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

यात आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे की, सुमारे 12 वर्षांपासून ग्रामविकास विभागाने संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र या दोन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 29 हजार ग्रामपंच्यायतमध्ये 20 हजार संगणकापरिचालक ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देण्याचे काम करत आहेत. या सेवांसह राज्य शासनाच्या दोन्ही शेतकरी कर्जमाफी योजना, ग्रामीण घरकुल योजनेचा सर्व्हे, पीएमकिसान योजना, कोरोना योद्धा म्हणून केलेले कार्य यासह सध्या सुरु असलेली शासनाची महत्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशी अनेक प्रकारची कामे संगणकापरिचालकांनी केले आहेत. परंतु, याकडे मात्र राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. संगणकापरिचालक फक्त ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन मागत आहेत. हा प्रश्‍न शासनाने सोडवणे अत्यंत गरजेचे असताना मानधन वाढीचा निर्णय शासनाने 19 जून रोजी निर्गमित केला आहे. पण हे मानधनवाढ राज्याच्या निधीतून न करता ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून केल्याने राज्यातील ग्रामपंचायतीनी या मानधनवाढीस विरोध केला आहे.

तरी शासनाने मागील 12 वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणार्‍या राज्यातील हजारो ग्रामपंचायतच्या संगणकपरिचालकांना लवकरात लवकर न्याय द्यावा, अन्यथा मुंबई येथे सुरु करण्यात येणारे बेमुदत धरणे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच राहील याची कृपया नोंद घ्यावी. अशी विनंती आंदोलकांतर्फे करण्यात आली आहे.

Exit mobile version