| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील दादर गावातील शाळेत शिकणार्या तीन अल्पवयीन मुलींची छेडछाड करणार्या दोन परप्रांतियांना गावातील महिलांनी बेदम चोप देऊन डांबून ठेवले. दादर सागरी पोलीस वेळेत घटनास्थळी हजर झाल्याने मात्र पुढील अनर्थ टळला. दोन्ही परप्रांतीय आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींची छेडछाड प्रकरणे सुरू असतानाच दि. 20 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या दरम्यान दादर गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या आवारात फिर्यादीची मुलगी व तिच्यासोबत शाळेत शिकणार्या अन्य दोन अल्पवयीन मुलींची परप्रांतीय आरोपी अखिलेश शामजी सैनी (20) व मुंनुकुमार त्रिभुवन चैहान (22)दोघेही सध्या राहणार जिते, ता. पेण व मुळ राहणार धंधरा, पो. लक्ष्मीनगर, ता. तुळशीपुर, जि. बलरामपूर-उत्तर प्रदेश यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने मोबाईल व चॉकलेट दाखवून हाताने बोलवण्याचा इशारा करून अश्लील हावभाव करत छेडछाड केली. हा प्रकार अल्पवयीन मुलींच्या नातेवाईकांना, गावकर्यांना व गावातील महिलांना समजताच त्या दोन्ही परप्रांतीय आरोपींना पकडून बेदम चोप देत डांबून ठेवले. ही घटना दादर सागरी पोलिसांना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या घटनेची नोंद दादर सागरी पोलीस ठाण्यात केली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशे अधिक तपास करीत आहेत.