सायबर क्राईम ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
तंत्रज्ञानाचा विकास झाल्यावर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी त्याचा फायदा घेणे सुरू केले. सामान्य लोकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याने अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांना सायबर प्रशिक्षण आवश्यक झाले आहे. हिच निकड लक्षात घेत गुन्हेगारी रोखण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या पुढाकाराने नवी मुंबई पोलिसांना सायबर गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात येत आहे.

भारतीय विद्या भवन यांच्या केएम मुंशी इन्स्टिट्यूट ऑफ डव्हान्स स्टडीज तर्फे नवी मुंबई पोलिसांसाठी पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे प्रशिक्षण 27 मार्च ते 31 मार्चदरम्यान होणार आहे. डिजिटल फॉरेन्सिक अ‍ॅण्ड सायबर क्राईम ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून नवी मुंबई पोलिसांना सायबर क्राईमच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज पार पडले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सायबर क्राईमच्या गुन्ह्यात होणारी वाढ लक्षात घेऊन नवी मुंबई पोलिसांसाठी या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. नवी मुंबईतील चाळीस पोलिसांना हे प्रशिक्षण देण्यात येणार असून, यात दोन परिमंडळमधील प्रत्येकी 15 आणि सायबर सेलमधील 10 अशा चाळीसजणांना प्रशिक्षित केले जाणार आहे.

Exit mobile version