आरसीएफ शाळेत प्रवेशाबाबत पालकांमध्ये संभ्रम

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षे अडचणीत येण्याची भिती

| अलिबाग | प्रतिनिधी |

आरसीएफ प्रशासनाने शाळेसाठी नवीन शैक्षणिक संस्थेची निवड केली आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन दिवस उलटून गेली आहेत. तरीदेखील नव्या शैक्षणिक संस्थेकडून अजूनही कोणतीच हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे आरसीएफ शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष अडचणीत येण्याची भिती पालकांमध्ये निर्माण झाली आहे.

पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आरसीएफ वसाहतीमध्ये शाळा चालविली जात होती. त्यानंतर डेक्कनने शाळा चालविण्यास नकार दिल्याने त्याबदल्यात आरसीएफ प्रशासनाने डिएव्ही कॉलेज मॅनिजिंक कमिटी नवी दिल्ली या संस्थेची निवड केली आहे. सोमवारी 16 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. जिल्ह्यातील शाळा सूरू झाल्या. मात्र, आरसीएफची शाळा अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण अधिकारी, आरसीएफ प्रशासन, शिक्षक, पालक अशी संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे अटी शर्तीवर आरसीएफ शाळा सुरू करण्यास सांगितले. येणारी नवीन संस्था सीबीएससी अभ्यासक्रमातील आहे. त्यामुळे उद्यापासून चालू होणाऱ्या शाळेत शिक्षकांनी सी.बी.एस.सी.अभ्यासक्रमा प्रमाणे मुलांना शिकविण्याचे निर्देश दिले आहेत. जोपर्यंत नविन संस्था प्रत्यक्ष येत नाही. तोपर्यंत शालेय गणवेशाबाबत मुलांना कोणतीही सक्ती असणार नाही. नवीन पाठ्यपुस्तके देखील पुढील निर्देश येईपर्यंत घेण्याची सक्ती करायची नाही. 9 वी ते 12 वी चे वर्ग स्टेट बोर्ड अभ्यासक्रमाप्रमाणेच सुरू राहतील, असे सांगण्यात आले. परंतु, सद्य स्थितीत असलेली आरसीएफ शाळेतील शिक्षक सीबीएससी शिकविण्यायोग्य आहेत, का असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, असा संभ्रम आजही पालकांसमोर आहे. काही पालकांनी प्रवेश काढून घेतले.

अन्यथा उद्रेक होण्याची शक्यता
पहीली ते बारावीपर्यंत आरसीएफची शाळा आहे. या शाळेत एक हजारहून अधिक विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देण्यासाठी पालक धडपडत आहेत. मात्र अद्यापर्यंत शिक्षण विभागासह कोणीही ठोस भुमिका घेत नसल्याची प्रतिक्रीया उमटत आहे. शिक्षणाबाबत जिल्ह्यात अनास्था दिसून येत असल्याचे चित्र आहे. लवकरात लवकर भूमिका न घेतल्यास उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून डीएव्ही या नवीन शैक्षणिक संस्थेची निवड केली आहे. हस्तांतरण प्रक्रीया पुर्ण झाल्यावर पूढील कार्यवाही होणार आहे.

महेश पाटील
प्रशासकीय अधिकारी,
आरसीएफ कंपनी थळ

शिक्षणाधिकारी प्रवेश घेण्याबाबत सांगतात. परंतु व्यवस्थापन अद्याप नसल्याने नवीन प्रवेश कसा घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार मुलांना शाळेत पाठविण्यात आले आहे. शाळेत दुरुस्तीचे काम सुरू आहे. मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा सवाल आहे. नवीन शैक्षणिक संस्था लवकर यावेत, मुलांचे शैक्षणिक भविष्य सुखरूप होऊ दे. शिक्षणाधिकारी, शिक्षकांची भुमिका संभ्रमावस्था निर्माण करणारी आहे. ठोस भूमिका कोणीही घेत नाही.

धनंजय म्हात्रे
पालक

Exit mobile version