अवजड वाहतुकीमुळे खोपटा पुलाची कोंडी

नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील पूर्व भागाला जोडणार्‍या खोपटा खाडी पुलावरून सुरू असलेल्या जड कंटेनर वाहतुकीमुळे दोन्ही पुलावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. याचा त्रास या मार्गावरील दररोज प्रवास करणार्‍या प्रवासी खास करून विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. या दोन्ही पुलावरून क्षमतेपेक्षा अधिक वजनाच्या कंटेनर ट्रेलरच्या वर्दळीमुळे दोन्ही खोपटा पुलाच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर वाहतूक कोंडीत अडकून पडलेला प्रवासी नागरीक, विद्यार्थी पुरता हैराण झाला आहे. तरी अशा समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

उरण तालुक्यात जेएनपीटीच्या अनुषंगाने मोठं मोठे उद्योग धंदे सुरू झाले आहेत. अनेक सिएफ एस, एमटी कंटेनर यार्ड आणि गोदामे निर्माण झाली आहेत. त्यातच उरणच्या पूर्व भागही सिएफ एस आणि गोदामे यांची उभारणी झपाट्याने होत आहे. त्यामध्ये बांधपाडा व कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीत या अगोदर ट्रान्स इंडिया, कॉन्टिनेटल, अमेया लॉजीस्टिक, न्यू ट्रान्स इंडिया, विरगो, ग्लोबीकॉन, आल कार्गो, काँरवान असे मुख्य आणि छोटी गोदामे एमटी यार्ड ही वसविले आहेत. या कंटेनर यार्डमधून जेएनपीटी बंदर तसेच इतर बंदरातून देश परदेशात आयात-निर्यात होणार्‍या मालाची रेलचेल ही मोठ्या प्रमाणात खोपटा पुलावरून रात्री-अपरात्री होत आहे.

अशा पूर्व विभागाला उरण शहरांशी जोडणार्‍या खोपटा पुलाची उभारणी ही राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांनी केली होती. त्या खोपटा (जुन्या) पुलावरून प्रवासी वाहना बरोबर 20 ते 30 टन क्षमतेच्या वाहनांची वर्दळ होऊ शकते, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. परंतु त्याच खोपटा पुलावरून मोठ्या प्रमाणात 60 ते 80 टन क्षमतेच्या मालानी भरलेल्या कंटेनर ट्रेलरच्या वाहतूक ही उरण तहसील, पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस आणि आरटीओचे अधिकारी वर्गाच्या संगनमताने राजरोसपणे सुरू आहे. अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे सातत्याने खोपटा पुलावर 60 ते 80 टन क्षमतेच्या अवजड वाहनांची संख्या बळावून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

माल भरण्यासाठी ये-जा करणार्‍या ट्रेलरला यार्ड मालकांनी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध न केल्याने ट्रेलर चालक आपल्या गाड्या ह्या खोपटा पुलावर व रस्त्यावरच पार्क करून ठेवण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे सिंगल रोड असलेल्या रस्त्यावरून जेमतेम दोन गाड्या पास होतात. रस्ता अरुंद असल्याने वाहने जाण्या येण्यासाठी जागाच शिल्लक उरत नाही आणि त्यात बेशिस्त वाहन चालकामुळे तर आणखी वाहतूक कोंडी बरोबर अपघात होत आहे. अशा उद्भवणार्‍या वाहतूक कोंडीचा त्रास हा नाहक त्रास खोपटा पुल आणि रस्ता तसेच सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा वाहतूक कोंडी वर ठोस उपाययोजना संबंधित प्रशासनाने करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोहर म्हात्रे यांनी केली आहे. तर या संदर्भात उरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

Exit mobile version