| पनवेल | वार्ताहर |
कामोठे परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी कामोठे बस स्टॉपजवळील सर्विस रोड सायन पनवेल महामार्गाला जोडावा तसेच सेक्टर 6अ वेंकट हॉटेलजवळ ते जवाहर इंडस्ट्री मार्गे कळंबोलीला जाणारा पूर्वीचा सेवा रस्ता तातडीने खुला करावा, अशी ठोस मागणी शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी केले आहे. त्यांनी या संदर्भात मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे.
कामोठेमध्ये प्रवेशासाठी सध्या फक्त एकच एन्ट्री पॉईंट उपलब्ध असल्याने शाळेच्या बस, रुग्णवाहिका आणि रोजच्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वेळ आणि इंधन वाया जाणे, आपत्कालीन सेवांना उशीर होणे अशा अनेक समस्या वाढल्या असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. कामोठे विकसित करताना सिडकोने एकच प्रवेशमार्ग ठेवला. नंतर पाठपुराव्यानंतर सिडकोकडून सदर क्षेत्र पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रस्त्यांच्या विस्तार व दुरुस्तीची जबाबदारी आता महापालिकेवर आहे. सुमारे 56 वर्षांपूर्वी हा सर्विस रस्ता वापरात होता. कोणतेही कारण न देता तो अचानक बंद करण्यात आला. यामुळे कळंबोलीहून येताना नागरिकांना महामार्गाचा धोकादायक पर्याय निवडावा लागत आहे.
सायन पनवेल महामार्गावर मागील काही वर्षांत 62 अपघातांत 23 जणांचा मृत्यू आणि 50 जण जखमी झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. दोन्ही सर्विस रस्ते पनवेल महापालिकेच्या विकास आराखड्यात समाविष्ट असूनही त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. महामार्गाला पर्यायी जोडणी मिळाल्यास सेक्टर 5, 6, 6अ, 7, 8 आणि 9 मधील नागरिकांचा प्रवास अधिक सुकर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी अमोल शितोळे यांनी मागणी करताना सांगितले आहे की, कामोठे बस स्टॉपजवळील सर्विस रस्ता महामार्गाला तातडीने जोडावा, सेक्टर 6 अ जवाहर इंडस्ट्री कळंबोली सर्विस रस्ता पुन्हा सुरु करावा, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीच्या उपाय योजना कराव्यात, नागरिकांचे जीवन आणि इंधन दोन्ही वाचवण्यासाठी प्रशासनाने त्वरीत कृती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
कामोठे सर्विस रोड महामार्गाला जोडा; शेकापची पालिकेकडे मागणी
