। तळा । वार्ताहर ।
राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेतर्फे गडकिल्ल्यांवर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर दुर्गरत्न प्रतिष्ठान तर्फे संवर्धन मोहीम राबविण्यात आली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असणार्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. येणार्या पिढ्यांना महाराजांचा इतिहास माहिती व्हावा यासाठी महाराजांनी बांधलेले व जिंकलेले गडकिल्ले यांचे संगोपन होणे गरजेचे आहे.
यावेळी तळगडावर जाण्यासाठी असलेल्या वाटेवरील पावसाळ्यात वाढलेली झाडी, दगड बाजूला सारून वाट मोकळी करण्यात आली. तसेच गडावर सभोवताली वाढलेले गवत कापून गड परिसराची स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थी व पालक वर्ग यांना तळ गडाविषयी माहिती व्हावी यासाठी लवकरच दुर्गरत्न प्रतिष्ठान तर्फे अभ्यास मोहीम राबविण्यात येणार असून या अभ्यास मोहिमेची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थी व पालक वर्ग यांनी तळगडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी अभ्यास मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले. याप्रसंगी जयेश गोरीवले, साहिल चोरगे, यश सावंत, चिन्मय शिगवण, राज गोरीवले, तेजस चव्हाण यांसह तळा विभागातील सदस्य उपस्थित होते.
तळगडावर राबविण्यात आली संवर्धन मोहीम
