विद्यार्थ्यांसाठी शौचालयांची उभारणी

मातृसेवा फाऊंडेशन, रोटरी क्लबचा मदतीचा हात

| रसायनी | वार्ताहर |

रसायनीतील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या बागेचीवाडी या शाळेच्या शौचालयाची अनेक वर्षांपासून दुरवस्था होती. शाळा दुर्गम भागात असून, शाळेतील बहुसंख्य मुले गरीब, आदिवासी भागातील आहेत. शाळेची पटसंख्या 85 ते 90 आहे. शिक्षकदेखील लांबचा प्रवास करुन शिकवायला येतात. मुलांसह शिक्षकांना शौचालय नसल्याने वेळोवेळी त्रास जाणवत असे. याची दखल घेत संतोष शिंगाडे यांनी ठाणे येथील मातृसेवा फाऊंडेशनच्या संस्थापिका संध्या सावंत यांना सांगितली. दरम्यान, मातृसेवातर्फे रोटरी क्लब ऑफ ठाणे वेस्ट यांच्याशी संपर्क साधून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात आला. कोणताही विलंब न लावता मुला-मुलींसाठी दोन सुसज्ज शौचालय फ्लॅगशिप बायोटेक कंपनीच्या सीएसआर फंडातून उभारण्यात आले. ग्रामस्थ संतोष शिंगाडे यांनी हे काम पूर्णत्वास नेले.

शौचालयांचे अनावरण मातृसेवा फाऊंडेशनच्या अध्यक्ष संध्या सावंत व रोटरी क्लब ऑफ ठाणेचे अध्यक्ष श्रीरंग देशपांडे, फ्लॅगशिप कंपनीचे सर्वेसर्वा केदार विध्वंस, आपटा ग्रामपंचायतीचे सरपंच दर्शन भोईर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष शिंगाडे यांच्या हस्ते रायगड जिल्हा परिषद बागेचीवाडी येथे पार पडले. या कार्यक्रमास उपस्थित मातृसेवा फाऊंडेशनचे अनेक सदस्य, रोटरी क्लबचे सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना नरळे, शिक्षक राजेश भोड व ग्रामस्थ पालक आणि शाळेतील सर्व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version