रुग्णांना मिळाला दिलासा
। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यात दिवसागणिक कोरोना पॉझिटिव्ह संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने अंजुमन हायस्कूल मुरुड येथील मुलींच्या विद्यालयात 50 बेडचे नवीन रुग्णालय सुरु करण्याचे आदेश खा.तटकरे यांनी दिले होते. त्याप्रमाणे तहसीलदार गमन गावीत व तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्या प्रयत्नातून
या ठिकाणी प्रशासनाने कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी नवीन सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
अंजुमन हायस्कूल मुरुड येथील मुलींच्या विद्यालयात 50 बेडची व्यवस्था झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी सुद्धा डॉक्टर तैनात करण्यात आले असून सर्व सुविधा रुग्णांना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासनाचा जोरदार प्रयत्न सुरु असून रुग्ण संख्या कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. मुरुड तालुक्यात रुग्ण संख्या जरी वाढत असली तरी कोणताही रुग्ण अत्यवस्थ नसून पॉझिटिव्ह असणारे रुग्ण 14 दिवसानंतर बरे होण्याचे प्रमाण सुद्धा खूप चांगले आहे. आरोग्य खात्याचे कर्मचारी व महसूल यंत्रणा रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे.