श्रीकांत पाटील यांचे मार्गदर्शन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
आपण कितीही वर्षे एखाद्या क्षेत्रात काम करत असलो तरी त्या क्षेत्रात झालेल्या बदलांची आपल्याला महिती नसते. ती माहिती प्रशिक्षण शिबिरांमधून मिळत असते. त्याचा फायदा आपल्याला होत असतो. या शिबीरांमधून कर्मचार्यानी प्रशिक्षणाचा आनंद घ्यावा, असे प्रतिपादन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, तालुका मुरुडचे श्रीकांत पाटील यांनी केले.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या कर्मचार्यांसाठी कायम स्वरूपी प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. त्याचे उद्घाटन रविवारी (दि.27) श्रीकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. आदर्शचे संचालक अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून एच. आर. डिपार्टमेंट व कर्मचारी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. अभिजित पाटील यांनी आपल्या भाषणातून प्रशिक्षणाचा उद्देश सांगताना आदर्शच्या कर्मचार्यांची प्रशिक्षणानंतर समाजात वेगळी ओळख कशी निर्माण होईल व संस्थेला त्याचा कसा फायदा होईल याचे महत्व विषद केले.
आदर्श भवनातील स्व. अनंत ह. पाटील (नाना) सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन समारंभास आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कैलास जगे, संचालक काका जैन, अनंत म्हात्रे, विलाप सरतांडेल, अभिजित पाटील, जगदीश पाटील, तज्ञ संचालक सुरेश गावंड, शाखा सल्लागार विजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी पाटील आदी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे आस्थापना सी. ओ. अजय थळकर, एच. आर. स्नेहा पोंगडे, विभागीय व्यवस्थापक राकेश घरत व रुपेश थळे यांनी केले.