खांदाडमध्ये कावीळचे चार रुग्ण; आरोग्य विभागाचे घराघरांत सर्वेक्षण सुरू
| माणगाव | प्रतिनिधी |
माणसाच्या जगण्याचा आधार असलेले पाणीच जर आजारांचे कारण ठरू लागले, तर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर? माणगाव नगरपंचायत हद्दीतील मोर्बा रोड, खांदाड परिसरात काळसर, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याच्या तक्रारींनी आता गंभीर स्वरूप धारण केले आहे.
या परिसरातील चार नागरिकांना कावीळ झाल्याची पुष्टी झाल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, तब्बल 35 वर्षांपूर्वी माणगावमध्ये कावीळच्या साथीने तीन नागरिकांचा बळी घेतला होता. त्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्याने माणगावकरांच्या मनात चिंतेचे सावट पसरले आहे. बुधवारी (दि.18) तालुका आरोग्य विभागाच्या पथकाने खांदाड परिसराची पाहणी केली. यावेळी नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते. परिसरातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाने घराघरांत सर्वेक्षण सुरू केले असून कावीळसदृश लक्षणे असलेल्या नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी संकलित केले आहेत.
मोर्बा रोड कॉर्नर ते जुनी गांधी राईस मिलपर्यंतच्या पावसाच्या पाण्याच्या गटारातूनच पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या जात असल्याची बाब समोर आली आहे. काही इमारतींच्या सांडपाणी वाहिन्या जमिनीखालून याच गटारात जोडण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी पाईपलाईनमधून आणि उघड्यावरून सांडपाणी वाहत आहे. कचरा व प्लास्टिकमुळे गटारे तुंबून सांडपाणी साचले आहे. अशा परिस्थितीत जलवाहिन्यांना गळती असल्यास दूषित पाणी त्यात मिसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जलवाहिन्यांची तातडीने तांत्रिक तपासणी होणे गरजेचे आहे.
काळ नदीतील पाणी बायपासच्या कामामुळे गढूळ झाल्याचे तसेच मुसळधार पावसामुळे डोंगरातील माती व गाळ नदीत मिसळत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे नदीतील पाणी, जलशुद्धीकरण प्रक्रिया आणि निवासी भागातील जलवाहिन्यांची स्वतंत्र तपासणी आवश्यक आहे. आता नगरपंचायतीच्या प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. जलवाहिन्यांची तपासणी, गटारांची स्वच्छता, सांडपाणी जोडण्यांवर कारवाई आणि सुरक्षित पाणीपुरवठा यासाठी तातडीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. माणगावकरांना आश्वासनांचे पाणी नको, नळातून स्वच्छ आणि सुरक्षित पाणी हवे! 35 वर्षांपूर्वीच्या कावीळ साथीची पुनरावृत्ती होऊ नये, एवढीच सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यानंतर जागे होण्यापेक्षा संकट येण्यापूर्वीच प्रशासनाने जबाबदारी पार पाडावी, हीच माणगावकरांची आर्त मागणी आहे.
श्रीमती पुरी
आरोग्य विभागाची वैद्यकीय पथके घराघरांत जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. नगरपंचायतीनेही पाण्याचे नमुने तपासणीसाठी अलिबाग येथे पाठविले असून प्रभावित प्रभागांत रिक्षाद्वारे दवंडी देण्यात येत आहे. नागरिकांनी पाणी उकळून, थंड करून व गाळून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुका आरोग्य विभागाच्या प्रमुख
