मातीयुक्त पाण्यामुळे नागरिक त्रस्त
| सुधागड- पाली | प्रतिनिधी |
अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहराला थेट अंबा नदीतून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या अंबा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ व दूषित स्वरूपात नागरिकांना मिळत असून, त्याबरोबरच अनेक वाहिन्या आतून गंजल्यामुळे पालीकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे भाविक व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पाली नगरपंचायत परिसरातील नळांना मागील महिनाभरापासून गढूळ पाणी येत आहे. नळाला पाणी आल्यावर सुरुवातीला मातीयुक्त पाणी येते आणि त्यानंतर थोडे स्वच्छ पाणी मिळते. अशुद्ध व मातीयुक्त पाण्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
अंबा नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी, कंपन्यांमधील प्रदूषित पाणी, घाण व कचरा मिसळल्यामुळे नदीचे प्रदूषण वाढले आहे. यामुळे नागरिक व जीवसृष्टीच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नळाला अतिशय दूषित, दुर्गंधीयुक्त व मातीयुक्त पाणी येत आहे. पूर्ण शहरातच दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.
अरिफा पठाण,
गृहिणी, पाली
