विद्यार्थी, कर्मचार्यांचे दायित्व डेक्कनचे
। अलिबाग । प्रतिनिधी ।
आरसीएफच्या कुरुळ वसाहतीतील शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यादृष्टीने आरसीएफ व्यवस्थापन करीत असलेल्या सकारात्मक प्रयत्नांना यश आले आहे. शाळेचे व्यवस्थापन डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांनी सुरू ठेवावे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई येथील विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या सुनावणीत घेतला आहे. तसेच कर्मचार्यांचे वेतन अदा करणे, ही प्राथमिक जबाबदारी नियुक्तीकर्ता म्हणून संस्थेची असून, संस्थेने वेतन थांबविणे योग्य नाही, असा निष्कर्षदेखील या सुनावणीदरम्यान काढण्यात आल्याची माहिती थळ आरसीएफचे प्रभारी मुख्य प्रशासकीय व्यवस्थापक महेश पाटील यांनी दिली.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे आणि आरसीएफ व्यवस्थापन यांच्यातील अंतर्गत करारानुसार आरसीएफ वसाहत कुरुळ येथे गेली 43 वर्षे शाळा सुरू आहे. मात्र, 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून शाळेसंदर्भात आरसीएफसोबत करार नूतनीकरण करण्यास डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी असमर्थता दाखविली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या भूमिकेमुळे या शैक्षणिक वर्षापासून पुढे शाळा सुरू ठेवण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली. या अनिश्चित परिस्थितीमध्ये शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने आरसीएफ व्यवस्थापनातर्फे डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांना शालेय व्यवस्थापन सुरू ठेवण्याबाबत वारंवार विनंत्या करण्यात आल्या. मात्र, करार नूतनीकरण न करण्याबाबत डेक्कन एज्युकेशन सोसायटी ठाम राहिल्याने आरसीएफ व्यवस्थापनातर्फे शिक्षण विभागामार्फत विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले. तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनांतर्गत शाळा सुरू ठेवण्यासाठी उच्च न्यायालयात दाददेखील मागण्यात आली.
या अनुषंगाने विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांच्या कार्यालयाद्वारे शाळेच्या व्यवस्थापनाबाबत 26 सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान शाळेचे व्यवस्थापन डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांनी सुरू ठेवावे, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शाळेतील एक हजार 180 विद्यार्थी तसेच 80 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे दायित्वदेखील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असल्याचे या निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र खासगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियम अधिनियम, 1977 कलम 4.3 नुसार कर्मचार्यांचे वेतन अदा करणे ही प्राथमिक जबाबदारी नियुक्तीकर्ता म्हणून संस्थेची असून, संस्थेने वेतन थांबविणे योग्य नाही, असा निष्कर्षदेखील या सुनावणीदरम्यान काढण्यात आल्याची माहिती महेश पाटील यांनी दिली.
..तोपर्यंत वेतन रखडणार
वेतन देण्याबाबत उपसंचालकांनी आदेश दिले आहेत. परंतु, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापन वेतानाच्या बिलावर स्वाक्षरी करीत नाही तोपर्यंत वेतन रखडलेलेच राहणार, अशी माहिती आरसीएफ शाळेतील सूत्रांकडून देण्यात आली.