उरण | वार्ताहर |
जासई गावाजवळ झालेल्या उड्डाणपूल अपघातात एक नव्हेतर इतरांचा ही मृत्यू झाला असल्याचा संशय येथील ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. संबंधित ठेकेदार हा मुबंईत ब्लॅक लिस्टमध्ये असतानाही या ठिकाणी उड्डाण पुलांची कामे सुरू आहेत. तरी या प्रकरणी सखोल चौकशी करून ठेकेदार जे. कुमार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी केली असल्याचे समजते.
जेएनपीटीच्या तीन हजार कोटी खर्च करून उभारण्यात येत असलेल्या सातपैकी जासई उड्डाणपुलावरील 20 क्रमांकाचा पीयर कॅपचा स्लॅब भरताना बूम प्लेअरला क्रेनचा धक्का लागून परात अचानक कोसळली. या घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून सहा कामगार गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. सदर घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली.
सदर कामांच्या ठिकाणी सतत जवळपास 30 ते 40 कामगार काम करीत असतात मग अपघात झाला त्यावेळी फक्त 10 ते 12 कामगारच ठेकेदाराकडून दाखविले जात आहेत. मग इतर कामगार यावेळी कुठे होते याची चर्चा सुरू आहे. ठेकेदार जे. कुमार यांनी प्रशासनाची दिशाभूल करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा येथील ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
जासई गावातील काही नागरिकांनी या अपघातात 8 ते 10 जणांचा बळी गेला असल्याचा संशय व्यक्त करीत कामाचा दर्जा निकृष्ठ असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.