| खारेपाट | वार्ताहर |
शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या उभ्या राहात आहेत, हे देशाच्या प्रगतीत फार मोठे योगदान आहे. आज महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने चांगले काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या, सिंचन क्षेत्रात काम करणारी गावे यांना एनएसईमध्ये आणल्याबद्दल संघाला मी धन्यवाद देत आहे, असे प्रतिपादन नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी केले. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने एनएसईच्या डॉ. आर.एच. पाटील सभागृहात राज्यस्तरीय कृषी फलोत्पादन, सिंचन, इन्शुरन्स, मार्केटिंग, फुड परिषद व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल होते. तर, प्रमुख पाहुणे म्हणून गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष एन.बी.गोदरेज हे होते. याप्रसंगी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ (सिरकॉट) डॉ. सुजाता सक्सेना, बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक अशोक कुमार पाठक, एफएमसी इंडिया कॉर्पोरेशनचे संचालक राजु कपुर, इफको लि.चे महाव्यवस्थापक डॉ. एम.एस. पवार, आरपीएच कॉलेज ऑफ हॉस्पिटलीटी मॅनेजमेंट स्टडिजचे प्रा. योगेश उतेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
राज्यात कृषी फलोत्पादनात उल्लेखनिय कार्य केलेल्या विविध संस्था संघटना, मक्याच्या प्रक्रिया उद्योगातून 90 महिलांना रोजागाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आळंदीच्या जयश्री साकोदे, फुड क्षेत्रात अभिनव प्रयोग करणाऱ्या पुणे येथील मृणाल फडके व दापोली येथील विणा खोत, तसेच नारंगी ता. अलिबाग येथील सोहम संतोष म्हात्रे यांजबरोबर विदर्भात कृषी पर्यटनाचा प्रकल्प राबविल्याबद्दल अमोल साठे व पवन साठे, बुलढाणा या सर्वांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. परषदेस राज्यातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे पदाधिकारी ज्योती राणे, कौशिक पाटील, विश्वास मोरे, प्रसाद जाधव, निरंजन पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.