रोह्यातील अनेक गावे अंधारात
। रोहा । वार्ताहर ।
ग्रामीण भागात विद्युत रोहित्रमधील ऑइल काढून त्यातील लाखो रुपये किंमतीची तांब्याची तार चोरीला जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, विद्युत रोहित्रमधून तांब्याची तार काढल्यानंतर हे रोहित्र निकामी होते. त्यामुळे त्यातून विद्युत प्रवाह खंडीत होत असल्याने संबधित गावे तीन-चार दिवस अंधारात बुडल्याने ग्रामस्थांना अनेक अडचनींचा सामना करावा लागत आहे. तर, दुसरीकडे तांब्याची तार चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वीज वितरण कंपनीला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
रोहा विरजोली मार्गावरील हाल खर्डी गावाला वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून विद्युत रोहित्रची व्यवस्था करण्यात आली होती. असे असताना 1 ते 15 जानेवारी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रात्री अंधाराचा फायदा घेऊन रोहित्रमधून वीज पुरवठा खंडीत करून त्यामधील जवळपास 1 लाख 65 हजार रु. किंमतीची तांब्याची बायडींग केलेली तार चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्युत रोहित्र निकामी झाल्यानंतर गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने गावात अंधारमय वातावरण पसरले आहे. याबाबत वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता रोशन अरुण धनवीज यांनी रोहा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.