पर्यावरणाचीदेखील हानी; मनोज खेडेकर यांचा आक्रमक पवित्रा
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये अलेक्झांडर हॉटेल, अशोक हॉटेल व इतर ठिकाणी अनधिकृतपणे विनापरवाना तंबु लावून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची राहण्याची व्यवस्था केली जात आहे. अशीच परिस्थिती बहुतांश हॉटेलमध्ये झाल्यास परवानाधारक हॉटेल मालकांना भविष्यात याची आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. तसेच, येथील पर्यावरणासोबतच वनराईचीदेखील मोठ्या प्रमाणात हानी होईल. त्यामुळे, ज्या-ज्या हॉटेलमध्ये अशाप्रकारे विनापरवाना तंबू लावून व्यवसाय सुरू करण्यात आलेले आहेत ते ताबडतोब बंद करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गुरूवारी (दि.16) माथेरानमधील अधीक्षक कार्यालयात जाऊन अधिकारी वर्गाला लेखी निवेदन सादर केले आहे.
खेडकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, अलेक्झांडर हॉटेल व अशोक हॉटेल या दोन्ही मिळकती हेरिटेज यादीमध्ये समाविष्ट आहेत. अशाप्रकाचे तंबू हॉटेलमधील पर्यटकांना भाड्याने देण्यासाठी हेरिटेज कमीटी व नगरपरिषदेकडून रीतसर परवानगी घेतलेली नाही. तरीही शेकडो तंबू पर्यटकांना उपलब्ध करुन अनधिकृतपणे हे व्यवसाय सुरु आहेत. सुट्ट्यांमधे या दोन्ही हॉटेलमधे प्रत्येकी दोनशे ते अडिचशे तंबू लावले जातात. त्यामुळे या प्रत्येक हॉटेलमधे 300 ते 500 लोक मुक्कामास असतात. एवढ्या लोकांच्या क्षमतेसाठी आवश्यक मलनिस्सारण प्रक्रीया केंद्र या दोन्ही ठिकाणी कार्यान्वीत नाहीत. त्यामुळे ड्रेनेज हे लगतच्या वनखात्याच्या जागेत सोडले जाते. त्यामुळे दुर्गंधीसोबतच ही जमीन प्रदुषीत होत आहे. त्याचा थेट परिणाम झाडांच्या ‘लाईफ स्पॅनवर’ होत आहे. अनेक झाडे सुकत आहेत किंवा अशक्त झाल्यामुळे पडत आहेत.
तसेच, या प्रमुख दोन हॉटेलमधे मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी पर्यटक भरल्यामुळे पाणीपुरवठा व घनकचरा व्यवस्थापनावर प्रचंड ताण पडत आहे. परिणामी आजुबाजुच्या भागात पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होत असतो. तसेच, घनकचरा जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. तंबू परिसरात प्लॅस्टीकचे प्रदुषण वाढले आहे. माथेरानची स्वयंनिर्भर अर्थव्यवस्था व इको सिस्टीम या तंबूंमुळे धोक्यात आली आहे. येथील छोटे लॉजींग व ‘होम स्टे’ व्यवसाय धोक्यात आले आहेत. त्यामुळे तातडीने त्यावर बंदी आणावी व भविष्यात पुन्हा असे प्रकार होऊ नयेत याकरीता स्पष्ट व कडक नियम बनवावेत, असे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निखिल शिंदे, आदेश घाग, वसंत कदम, मुकुंद रांजणे यांसह अन्य नागरिक उपस्थित होते.
पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी
माथेरानमधील वन हे 3-5 स्तरीय वन आहे. ज्यामधे मोठ्या वृक्षांपासुन छोट्या झुडपांचा समावेश होतो. तंबू लावण्यासाठी अनेक छोट्या झाडांची व झुडपांची मोठ्या प्रमाणात कत्तल करावी लागते आणि यातील एकच स्तर जिवंत ठेवला जातो. ही पर्यावरणाची मोठी हानी आहे. तसेच, पर्यटकांची संख्या व वाढलेल्या व्यवसायामुळे अनेक हॉटेल्स व बंगले मालक या तंबू व्यवसायाकडे आकृष्ट होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात राहण्याची व्यवस्था उपलब्ध झाल्यास येथील वनराईचा नाश होईल आणि येथील पर्यावरण धोक्यात येईल.