मूर्तिकार, कारखानदार आर्थिक अडचणीत,
कोरोनाच्या नियमामुळे गणेश मंडळासह भक्तांमध्ये नाराजी
उरण | वार्ताहर |
राज्य शासनाने कोरोना रोगाचा वाढता प्रभाव लक्षात घेता गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध आणले आहेत. यामध्ये गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याशिवाय सार्वजनिक गणेश मूर्तीवर मर्यादा घालण्यात आलेली आहे. शिवाय, मिरवणूक काढता येत नाही तसेच गर्दी होईल व कोरोना वाढेल असे कोणते कार्यक्रम साजरे करण्यास बंदी घातल्याने कोणतेही सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम गणेशोत्सव मंडळांना तसेच गणेशभक्तांना आयोजित करता येणार नाही. गेल्या वर्षी गणेशोत्सवाचा आनंदाला कोरोनामुळे मुकावे लागले. यावर्षीही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करता येणार नसल्याने गणेशभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे.
शुक्रवार, 10 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून, रविवार, दि. 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे विसर्जन करण्यात येणार आहे. आता काही महिन्यांवर गणेशोत्सव आल्याने उरणमधील बाजारपेठेत सुंदर व आकर्षक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती दाखल झाल्या आहेत.
बाजारपेठेत प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेश मूर्तीना मोठी मागणी असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती खूप मोठ्या प्रमाणात उरणमध्ये दाखल झाल्या आहेत. अनेक गणेशभक्तांनी आपल्या गणेशमूर्तीची बुकिंगसुद्धा करून ठेवली आहे. पाचशे रुपयांपासून ते तीन हजार, पाच हजार रुपयांपर्यंत गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध आहेत. पण, यंदा मात्र गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट, सावट असल्याने गणेश मूर्तिकार, कारखानदार तसेच गणेशभक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
शासनाने कोणताही निर्णय घेताना राज्यातील गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार, कारखानदार यांच्याशी चर्चा करूनच नियमावली जाहीर करावे. मूर्तिकार, कारखानदार यांच्यावर असलेले कर्ज माफ करावे. कर्जापोटी कारखानदारांनी, मूर्तीकारांनी आत्महत्या केली, त्यांना शासनातर्फे नोकरी देण्यात यावी. तसेच आर्थिक मदत त्यांना देण्यात यावी.
किसन म्हात्रे, गणेश मूर्तिकार, उरण, (सर्वसामान्य नागरिक)