चार दिवसात 22 हजार चाचण्या
पनवेल | वार्ताहर |
विविध उपाययोजना आणि निर्बंध याद्वारे पनवेल महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. पालिका कार्यक्षेत्रात पॉझिटिव्हीटी दर देखील कमी होऊन 2.5 वर आला आहे. परंतु असे असले तरीहीलॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यापासून अनेकवेळा नागरिक विनाकारण फिरत असल्याचे दिसून येत आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही अजून संपलेली नाही. मागील महिन्यात पॉझीटिव्ह येणार्या नागरिकांची संख्या कमी झाली होती मात्र गेल्या काही दिवसापासून या संख्येत कमी- अधिक प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. डेल्टा प्लस उत्परिर्वतित विषाणूचा धोकाही वाढला आहे. एकूणच सार्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना आयुक्त गणेश देशमुख वैद्यकिय आरोग्य विभागास दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या चाचण्या पनवेल कार्यक्षेत्रात केल्या जात आहेत.
पनवेल कार्यक्षेत्रात दररोज सरासरी 4000 आरटीपीसीआर आणि अॅन्टीजन चाचण्या करण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार गेल्या चार दिवसांमध्ये जवळपास 22 हजाराहून अधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम हळूहळू दिसू लागला असून पनवेल कार्यक्षेत्राचा पॉझीटिव्हीटी दर कमी होऊन हा दर 2.5 झाला आहे. उपायुक्त सचिन पवार आणि मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या या चाचण्या पनवेल कार्यक्षेत्रातील पनवेल, न्यू पनवेल,कामोठे, कळंबोली, खारघर, तळोजा या नोडमधील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार करण्यात येत आहे. या नोडमधील गर्दीची ठिकाणे, बाजार, रेल्वे स्थानके, बस स्थानके, कंटेन्मेंट झोन, शासकीय आस्थापना, दुकाने अशा सर्व ठिकाणी आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत.
प्रभाग अधिकारी आणि पोलिस विभागाशी समन्वय साधून सर्व डॉ. प्रियांका माळी यांच्या नियोजनाप्रमाणे विविध नोडमधील संबधित नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरर्स त्यांच्या टीमसहीत सर्वत्र जाऊन आरटीपीसीआर व अॅटीजन चाचण्या करीत आहेत.
दिनांक केलेल्या चाचण्या
9 जुलै 5 हजार 919
10 जुलै 6 हजार 193
11 जुलै 3 हजार 285
12 जुलै 3 हजार 702
13 जुलै 3 हजार 862