रेशन दुकानदाराच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा – आ. जयंत पाटील

| पळसगांव वाडी/आंब्रेवाडी । वार्ताहर ।
रास्त भाव धान्य दुकानधारक गीता गजानन पवार यांनी केलेल्या भ्रष्टाचार व अपहाराबाबतची चौकशी केली जावी, अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी केली आहे. गीता गजानन पवार या धान्य दुकानाच्या परवानाधारक असून दुकानाची जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड अलिबाग यांनी सहा. पुरवठा अधिकारी यांचे अधिपत्याखाली तपासणी गठीत करून दि. 17/10/2020 रोजी दुकानाची तपासणी करण्यात आली असता गंभीर स्वरूपाचा दोष दिसून आला आहे. सदर दुकानदाराने कार्ड धारकांना एका महिन्याचे धान्य दिले नसल्यामुळे तफावत दिसून आली आहे. तसेच माहे मे 2020 मध्ये ए.एन.बी.वाय. तांदूळ वाटपामध्ये दुकानदाराने पुर्णपणे अपहार केलेले असून नियमानुसार वाटप झालेले नाही. सदरील तांदूळ हे बिना रेशनकार्ड धारकांना व स्थलांतरीत मोलमजूरी करणार्‍या व्यक्तींसाठी दयावयाचे होते परंतु दुकानदाराने सदरील तांदूळ पेन्शन धारक व सधन व्यक्तींना दिलेले आहे. तसेच मुंबईमधील रेशनकार्ड धारकांच्या नांवे खतावणी करून अपहार केलेले आहेत. सदरील सर्व अपहार प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी संबंधित विभागास सादर अभिलेखाची तपासणी करून योग्यती कार्यवाही करण्याचे सांगण्यात आलेले असतानाही त्यासंबंधी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर तात्काळ कारवाई करून सदर रास्तभाव धान्यदुकान मौजे पळसगाव बु. येथील महिला बचत गटांना चालविण्यास परवानगी देण्यात यावी. यासाठी आ.जयंत पाटील यांनी सभागृहात विशेष उल्लेखाद्वारे मागणी केली.

Exit mobile version