| नागोठणे | वार्ताहर |
न्यायालयीन प्रक्रियेत उलटतपासणी हा आपल्या कामाचा एक महत्त्वाचा भाग आहे. उलटतपासणीत एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नामुळे संपूर्ण खटल्याला कलाटणी मिळू शकते. त्यामुळे न्यायनिर्णय देताना न्यायाधीश उलटतपासणी बघत असतात. त्यामुळेच उलटतपासणी ही एक महत्त्वाची प्रक्रिया असून, त्यातून वकील स्वत:ची ओळख निर्माण करतात, असे प्रतिपादन रोहा न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ आर.बी. सावंत यांनी केले.
अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेकडून वकिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात उलटतपासणी या विषयावर निमंत्रित वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विधिज्ञ आर.बी. सावंत यांनी उलटतपासणीतील काँन्ट्रॅडिक्शन, ॲडमिशन व ओमिशन यांतील बारकावे सांगतानाच काही महत्त्वाचे न्यायनिर्णय उपस्थित वकिलांसमोर सादर केले. तर, प्रमुख दिवाणी न्यायाधीश सुनील महाले यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वकील वर्ग उपस्थित राहिल्याबद्दल कौतुक करुन भविष्यातही असे कार्यक्रम सुरु ठेवा, त्यासाठी सहकार्य मिळेल असे बोलून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
रोहा वकील संघटनेच्या सहकार्याने रोहा न्यायालयातील वकील बार रुममध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला रोहा दिवाणी व फौजदारी न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश सुनील महाले, सह न्यायाधीश मेघा हासगे, रोहा वकील संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब देशमुख, ज्येष्ठ विधिज्ञ आर.बी. सावंत, ज्येष्ठ विधिज्ञ एम.डी. पाटील, अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेचे अध्यक्ष धनंजय धारप, उपाध्यक्षा मिरा पाटील, उपाध्यक्ष समीर सानप, सचिव महेश घायले, कोषाध्यक्ष दिनेश वर्मा, कार्यालयीन सचिव देवयानी मोरे, कार्यालयीन सहसचिव दिव्या सावंत, सह कोषाध्यक्ष कविता जोशी, अधिवक्ता परिषदेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य स्वराज मोरे, अधिवक्ता प्रवीण मुसळे, एम.के. शिंदे आदींसह अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेचे सदस्य यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्ता मिरा पाटील यांनी केले. तर समारोप करताना अध्यक्ष धनंजय धारप यांनी अधिवक्ता परिषद काय आहे व परिषदेचे कार्य कसे चालते याची संक्षिप्त माहिती दिली.