| नवी मुंबई | वार्ताहर |
रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी चोरी प्रकरणात तीन सराईत चोरट्यांना बेलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी वेगवेगळी शिक्षा ठोठावली आहे. गेल्या चार महिन्यांपासून तीनही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरल्याच्या प्रकरणात आरोपी रफिक बुधर, रोशन कोकरे व सोमनाथ सोनवणे यांना अटक करण्यात आली होती. तिघेही आरोपी सराईत वाहन चोरटे असून पार्किंगमधील दुचाकी वाहने चोरून त्यांची दुसरीकडे विक्री करत होते. या प्रकरणाचा वाशी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने उलगडा केला होता. त्यानंतर त्यांना अटक केली होती. या वेळी आरोपी रफिक बुधर याच्यासह रोशन कोकरे व सोमनाथ सोनवणे या दोघांनी प्रत्येकी एक दुचाकी चोरल्याचे तपासात उघड झाले होते. या प्रकरणी बेलापूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात केले होते. या सुनावणीदरम्यान न्या. एस. एस. माने यांनी उपलब्ध साक्षी पुराव्यावरून आरोपी रफिक बुधर याला तिन्ही गुन्ह्यामध्ये दोषी ठरवून 4 महिने 19 दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच रोशन कोकरे व सोमनाथ सोनावणे यांनादेखील दोषी ठरवून रोशनला 6 महिने 8 दिवसांची; तर सोमनाथला 10 महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.