| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महानगरपालिकेचा विकास झपाट्याने होत आहे. सहा वर्षांचा आयुर्मान असलेल्या महानगरपालिकेची प्रशासकीय घडीदेखील योग्यरित्या बसली असताना पुन्हा एकदा शहरी आणि ग्रामीण भागातील विकासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसून येत आहे. पालिका क्षेत्रातील 29 गावांमध्ये प्राथमिक सुविधांचा वानवा असल्याची बाब यामुळे प्रकर्षाने समोर आली आहे.
ग्रामीण भागात भरपावसात पाण्याची समस्या भीषण आहे. याव्यतिरिक्त पावसाळी काही गावातील अंतर्गत गटारे, नाले मोडकळीस आले असून, 29 गावांमध्ये शेकडो ठिकाणी गटारांवरील झाकणे गायब झाली आहेत. पालिकेच्या माध्यमातून काही गावांमध्ये स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना राबवत गावांची विकासकामे हाती घेतली आहेत. मात्र, ही कामेदेखील बहुतांशी ठिकाणी अर्धवट स्थितीत आहेत.
कोपरा गाव, खुटारी, धरणा, तळोजे मजकूर, धानसर, वळवली, टेंभोडे आदींसह अनेक गावांत अद्याप विविध समस्या उद्भवल्या आहेत. तळोजे मजकूर येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील याबाबत आवाज उठवत असतात. नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने माजी नगरसेवक ग्रामीण भागात फिरकत नसल्याची तक्रार सिद्धी करवले गावातील रहिवासी श्रीकांत पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे, कामे करताना शहरी भाग आणि ग्रामीण भाग असा भेदाभेद होता कामा नये, अशी भावना माहिती अधिकार कार्यकर्ता तेजस पाटील यांनी व्यक्त केली आहे.