| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यांतील पोटलवाडी गावात गोवंश कत्तल झाल्याचे शेजारच्या स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. कर्जत पोलिसांनी तत्काळ धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत दोघांना ताब्यात घेतले असून, तिसरा व्यक्ती फरार झाला आहे.
कर्जत तालुक्यातील पोटल वाडी येथे गुरुवारी (दि.27) मध्यरात्री गोवंश जनावरांची अवैध कत्तल सुरू असल्याची माहिती बजरंग दल यांना मिळाली होती. त्याबाबत स्थानिक गोरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कर्जत पोलिसांनी रात्री धाड टाकली. त्यावेळी कर्जत पोलिसांच्या पथकाने गावात झडती सत्र सुरू केल्यानंतर एका घरातील किचन व बाथरूममध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कर्जत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिमरान मालदार (27) रा. पोटलवाडी आणि समीर अहमद सुर्मे (37) रा. साळोख यांना ताब्यात घेण्यात आले असून उस्मान कर्णेकर हा तिसरा व्यक्ती फरार आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गोमांस आढळल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून काही नमुने जप्त केले. उर्वरित मांस जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून पुरण्यात आले. जप्त नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. दरम्यान, कर्जत परिसरात जनावरांची अवैध वाहतूक आणि कत्तलीच्या घटनांबाबत ग्रामस्थांनी गृह विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उप अधिक्षक राहुल गायकवाड आणि कर्जत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन स्थानिक पातळीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले. या प्रकरणाचा तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण नवले करीत आहेत. दोन्ही आरोपींना कर्जत दिवाणी न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कर्जत तालुक्यातील पोटल वाडी गावात गोहत्या; दोघांना अटक
