माणसातील माणुसकीचे दर्शन
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
कडक उन्हाच्या झळांमुळे माणसांसह पक्षी-प्राणीही त्रासले आहेत. या कालावधीत त्यांची तहान भागविण्यासाठी जांभुळपाडा येथील व्यपारी सचिन मजेठिया यांनी आपल्या दुकानाशेजारी पक्षी व प्राण्यांसाठी पाणपोई निर्माण केली आले. त्यामुळे सचिन मजेठिया यांनी माणसातील माणुसकीचे दर्शन घडवून सर्वांनाच आदर्श घालून दिला आहे.
सध्या पारा हळूहळू वर चढत असल्याने वातावरणामध्ये कमालीची उष्णता वाढली आहे. दुपारी तर प्रचंड उन्हाच्या झळांमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. एप्रिल महिन्यातर सुधागडातील तापमान तब्बल 32 ते 36 अंशावर पोहोचत असते. यंदाही तापमानात कमालीची वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. वाढत्या तापमानाचा तडाखा हा मानवाला तर बसतच आहे, त्याचप्रमाणे पशू-पक्षी, प्राणी, वनस्पती देखील त्याच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत. त्यामुळे त्यांना होणार्या त्रासाची दखल जांभुळपाडा येथील व्यापारी सचिन मजेठिया यांनी घेतली आहे. त्यांनी जांभुळपाडा गावात ठिकठिकाणी पाणपाई उभारल्या आहेत.
ठिकठिकाणी पाणपोई उभारण्याचे काम
कडाक्याच्या उन्हामध्ये पाणतळ, तलाव, डोह, नद्या, ओहळ हे आटत चालले आहेत. त्यामुळे काहीच दिवसांमध्ये पशु-पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड होणार आहे. त्यासाठी सचिन मजेठिया यांच्याकडून जांभुळपाडा गावाच्या परिसरात ज्या ठिकाणी पशु-पक्षांचा सतत वावर असतो अशा 10 ते 12 ठिकाणांचा शोध घेण्यात आला आहे. त्या ठिकाणी पाणपोई उभारण्याचे काम त्यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
तहानलेल्या मुक्या पशू-पक्ष्यांना पाणी दिल्याचे समाधान शब्दांमध्ये वर्णन करणे कठीण आहे. पक्षी पाणी पिऊन आकाशामध्ये उंच भरारी घेतात तेव्हाच कळते की, ते समाधानी झाले आहेत, त्यांची तहान भागली आहे. प्रत्येकाला अशा ठिकाणी येऊन पशू-पक्ष्यांसाठी काम करता येत नसेल तर त्यांनी आपल्या घराच्या बाहेर, खिडकीमध्ये वर्हांड्यात एखाद्या स्वच्छ भांड्यामध्ये पाणी ठेवावे. असे केल्याने त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल.
– सचिन मजेठिया