। पनवेल । प्रतिनिधी ।
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था यांच्या तर्फे पनवेल महानगरपालिकेवर दिव्यांगांचा बेमुदत हल्लाबोल धडक मोर्चा व ठिय्या आंदोलन 2 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.पाटील व पनवेल तालुका अध्यक्ष संदीप काशीद यांनी महानगरपालिकेला पाठवले आहे. पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन आठ वर्षे झाली तरी दिव्यांगांना 5% निधी व्यक्तीरिक्त अन्य कोणत्याही सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाचे धोरण महानगरपालिकेने ठरविलेले नाही त्यामुळे येथील दिव्यांग दुर्लक्षित व अविकसित आहे. दिव्यांगांनी स्वतःच्या खर्चाने उभारलेल्या सर्व टपर्यांना व्यवसाय परवाने दिलेले नसल्याने व्यावसायिक दिव्यांगांना व्यवसाय कर्ज, लाईट मीटर व इतर सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे व्यवसाय परवाने व उदरनिर्वाह, सर्वांगीण विकासाच्या योजना यांकरिता 2 एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.