काँग्रेसने निर्माण केले, ते मोदींनी मित्रांना विकले: प्रियांका गांधी

| नंदुरबार | प्रतिनिधी |

सर्व सत्ता, साधनं, मोदींकडे आहेत. मग आपण एकटे कसे लढत आहात? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत काय केले? जे काँग्रेसने निर्माण केले, ते मोदींनी मित्रांना विकले, असा हल्लाबोल काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँगेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, आदिवासींसाठी काँग्रेसने अनेक योजना सुरु केल्या. राहुल गांधी असे नेते आहेत ज्यांनी चार हजार किलोमीटरची यात्रा केली आहे. काँग्रेसचा पाया गांधी विचारांचा आहे. लोकशाहीत जनता सर्वोतोपरी असते. पण, भाजपची विपरीत विचारधारा आहे. आदिवासी संस्कृतीचा आदर भाजप करीत नाहीत, ते संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यावेळी आदिवासींवर अन्याय होतो, त्यावेळी भाजप गप्प राहते. आदिवासींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने एकमेव आदिवासी मुख्यमंत्री सोरेन जेलमध्ये पाठवले आहेत.

मोदी देशातील गरिबांबद्दल बोलतात एक आणि दुसरे करतात. भाजप सतत आदिवासींचा अपमान करत आहे. देशात 22 लाख आदिवासींना जमीन पट्टे दिले नाहीत. मोदी सांगतात, मी सबरीचा पुजारी आहे. पण देशात शेकडो शबरींचा अपमान केला जातं आहे, तेव्हा मोदी गप्प का राहतात, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

काँग्रेसची गॅरंटी, सर्व आश्‍वासनं पूर्ण करणार
जे काँग्रेसने निर्माण केले, ते मोदींनी मित्रांना विकले. मोदींनी राज्यातील मोठ्या उद्योगपतींचे 16 लाख करोडचे कर्ज माफ केले. जोवर आवाज बंद होत नाही, तोवर बोलणार आहे. सरकार बदलेपर्यंत बोलत राहणार आहे. काँग्रेसची गॅरंटी, सर्व आश्‍वासनं पूर्ण करणार आहे. 25 लाखांपर्यंत उपचार मोफत होणार आहेत. परिवारातील सर्वात मोठ्या महिलेच्या खात्यात एक लाख देणार आहोत. जो पदवीधर आहे त्याला आम्ही नोकरी देणार आहोत. 30 लाख पदं भरणार आहोत, अशा घोषणा त्यांनी यावेळी केल्या.
Exit mobile version