खारघर संघ विजयी; पनवेल संघाचा केला पराभव
| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पै. अन्वर बुराण स्मृतीचषक चौदा वर्षांखालील मुलांच्या एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत बी.पी. पाटील क्रिकेट अकॅडमी खारघर संघाने अंतिम सामन्यात प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघावर विजय मिळवत चॅम्पियन्स होण्याचा मान मिळवला आहे.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघाने जिंकला व प्रथम फलंदाजीसाठी बी.पी. क्रिकेट अकॅडमी संघाला आमंत्रण दिले. बी.पी. पाटील क्रिकेट अकॅडमी संघाने 39.2 षटकांत सर्व गडी गमावत 162 धावा फलकावर नोंदवल्या. त्यामध्ये रोहन चौरे यांनी सर्वाधिक 33 व आदित्य यादव 18 धावा काढल्या. प्रतिक क्रिकेट अकॅडमीकडून आयुष वढे व पार्थ जंगम यांनी प्रत्येकी तीन फलंदाज बाद केले. 163 धावांना उत्तर देताना प्रतिक क्रिकेट अकॅडमी संघाने 9 गडी बाद 71 धावा काढल्या. त्यामध्ये युवराज घरत यांनी सर्वाधिक 20 व अंश माळी यांनी 18 धावांचे योगदान संघाला दिले. बी.पी पाटील संघाकडून अथर्व उंडे यांनी सर्वाधिक तीन फलंदाज बाद केले, तर श्रेयांक मुनी व अथर्व पवार यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
पावसामुळे सामना थांबवावा लागला. त्यानंतर (नयन कट्टा रनरेट नियमानुसार) बी.पी पाटील क्रिकेट अकॅडमी खारघर संघाला विजयी घोषित करण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या आदित्य यादव याला मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून श्रेयांक मुनी, उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आदित्य यादव, तर अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून अथर्व उंडे स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू म्हणून पार्थ जंगम यांना झुंझारचे सचिव किशोर तावडे, सदस्य अजय टेमकर, अॅड. पंकज पंडित, बी.पी. पाटील क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक कुणाल पाटील, आकाश भोईर, पनवेल संघाचे प्रशिक्षक प्रतिक मोहिते यांच्या हस्ते चषक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.