सकाळपासून येताहेत धमकीचे फोन कॉल्स
| पेण | प्रतिनिधी |
रायगड जिल्हयात अनेक ठिकाणी दुर्गम भागामध्ये वैद्यकिय सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. त्याचाच फायदा घेत अनेक भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. असाच काहीसा प्रकार सुधागड तालुक्यातील परळी येथे चालू असल्याचा नागरिकांना संशय होता. याबाबतची व्यथा त्यांनी कृषीवलच्या पत्रकाराकडे व्यक्त केली. अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचं काम कायमच कृषीवलने केले आहे. त्यामुळे आलेल्या तक्रारीनूसार कृषीवलच्या प्रतिनिधींनी परळी गाठली.
ज्या धन्वंतरी क्लिनिकबद्दल तक्रार होती, त्याठिकाणी पाहणी केली असता भयानक बाब समोर आली. क्लिनिकच्या बोर्डावर डॉ.श्री. धर्मेश राठोड हे नाव होते. मात्र, आत गेल्यानंतर डॉक्टर धर्मेश राठोड नव्हतेच. त्यांच्या ठिकाणी प्रॅक्टीस करणारे सुभाष दास होते. त्यांना आपण डॉ.धर्मेश राठोड का? असे विचारले असता त्यांनी डॉक्टर साहेब रुग्णांना तपासण्याकरीता बाहेर गेले असल्याचे सांगितले.
चर्चा सुरु असताना दवाखान्यात लावण्यात येणाऱ्या पदवीचे कागदपत्रे कुठे आहेत, याबाबत विचारणा केली असता त्यांनी डॉक्टरांच्या घरी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी ते स्वतः डॉक्टर असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनाही पदवीबाबत विचारणा केली असता त्यांनी कागदपत्रे घरी असल्याचे सांगितले. त्यांना ते घरून आणण्यास सांगितले असता त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. आपल सत्य बाहेर येईल या भीतीने त्याने कृषीवलच्या प्रतिनिधींना साहेब आतमध्ये या आपण बोलू. आपला काय खर्च असेल ते देऊ, अशी थेट ऑफरच दिली.
कृषीवलच्या प्रतिनिधीने गोड बोलून डॉ. धर्मेश राठोड यांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवला आणि त्यांच्याशी संपर्क केला. त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ते रोज सकाळी क्लिनिकला येतात. त्याप्रमाणे आमच्या प्रतिनिधींनी आठ दिवस डॉक्टर राठोड येतात की, नाही याकडे लक्ष ठेवले होते. अखेर आठवडाभरानंतरही डॉक्टर भेटत नसल्यामुळे डॉक्टरांना विचारणा केली असता धर्मेश राठोड यांनी आपला शब्द फिरवत सासू आजारी आहे, तीला फिट आली होती, हव असेल तर सिटीस्कॅनचा रिपोर्ट पाठवतो. त्यामुळे मी क्लिनिकमध्ये येत नसल्याचे सांगितले.
एकंदरीत या प्रकारामध्ये माहिती घेतल्यानंतर समजले की, धर्मेश राठोड यांच्या नावाची क्लिनिकला फक्त पाटी लावली आहे. ते क्लिनिकला येतच नाहीत. क्लिनिकही सुभाष दास हेच चालवतात. त्यांच्याकडे कोणतीही पदवी प्रथमदर्शी नसल्याचे आढळून आले. त्यानंतर सुभाष दास यांना तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात येण्यास सांगितले. मात्र त्या सुमारास सुधागडच्या एका लोकप्रतिनिधींचा फोन आमच्या प्रतिनिधींना येऊन डॉक्टर किती चांगले आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर बऱ्याच मार्गानी आमच्या प्रतिनिधींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
सकाळपासून धमकीचे फोन
आमच्या प्रतिनिधीला आज सकाळपासून डॉक्टरांच्या विरोधात चर्चा केल्यास बघून घेऊ असे धमकीचे कॉल्स येत आहेत. 9022885359 या क्रमांकावरुन सहा वेळा फोन करण्यात आले आहेत. तसेच पालीत या तुम्हाला बघून घेऊ, अशा प्रकारची धमकी देण्यात आली असून याबाबत पेण पोलीस ठाण्यात आमच्या प्रतिनिधीने तक्रार दिली आहे.