मुख्याधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पहाणी
| उरण | वार्ताहर |
उरण नगरपालिका हद्दीत एकमेव असलेले वीर सावरकर मैदान हे गर्दुल्ले व दारुडे यांचा अड्डा बनला आहे. याबाबत नगरपालिकेकडे उरण काँग्रेसने तक्रार केल्यानंतर घटनास्थळी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी येऊन पहाणी करून कारवाईचे संकेत दिले आहे. यामुळे खेळाडूंमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. नगरपालिकेने वीर सावरकर मैदान खेळण्यासाठी आरक्षित असतानाही त्याठिकाणी गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे. परंतु त्यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने हे मैदान खेळांसाठी न रहाता त्याठिकाणी गर्दुल्ले व दारुडयांचा अड्डा बनला आहे. तसेच वहानेही वेडीवाकडी मैदानात कुठेही उभी केली जात आहेत. त्यामुळे खेळाडूंना खेळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहेत. मद्यप्रेमी तेथे येऊन बेकायदेशीर पणे बिनधास्त दारू पिऊन दारूच्या बाटल्या तेथेच फोडतात त्यामुळे त्या काचांमुळे मुलांना व खेळाडुंना दुखापत होण्याच्या घटना घडल्या आहेत.
याबाबत तत्कालीन मुख्याधिकारी संतोष माळी यांच्याकडे उरण तालुका मराठी पत्रकार संघाने तक्रार करून दोन वेळा साफसफाई व पोलिसांमार्फत कारवाई केली होती. परंतु पुन्हा काही दिवसांनी जैसे थे परिस्थिती निर्माण होत आहे. आता सुद्धा पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाल्यावर उरण काँग्रेसने याची दखल घेत मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे तक्रार केली असता घटनास्थळी येऊन त्यांनी पहाणी केली. त्यानंतर आपण लवकरच कारवाईचे संकेत दिले आहे.
यावेळी उरण काँग्रेसचे पदाधिकारी किरीट पाटील, मार्तंड नाखवा, प्रकाश पाटील, सदा पाटील, उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर, सचिव अजित पाटील, नगरपालिकेचे झुंबर माने, हरेश तेजी व खेळाडू उपस्थित होते.