आसे केंद्रशाळेचे गंभीर प्रकरण

56 विद्यार्थ्यांचा फक्त कागदोपत्री पट

| पालघर | प्रतिनिधी |

मोखाडा तालुक्यातील केंद्रशाळा आसे या जिल्हा परिषद शाळेचे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. या शाळेत पहिले ते आठवीचे वर्ग असून येथे 56 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, यातील गंभीर बाब म्हणजे 15 जुन म्हणजेच शाळा सुरू झाल्यापासून चौथीचा 1, सहावीचे 2 आणि सातवीचे 2 असे फक्त पाचच विद्यार्थी हजर राहत आहे. यामुळे फक्त शाळाबाह्य विद्यार्थी दिसू नये यासाठी कागदोपत्री पट दाखवला गेला असला तरी या उरलेल्या 51 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय? आणि एवढा गंभीर विषय समोर असताना जिल्ह्यापासून तालुक्यापर्यंत अस्तित्वात असलेली शिक्षण व्यवस्था नेमके काय काम करत आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

आसे ही ग्रामपंचायत तालुक्यातील दोन नंबरची मोठी ग्रामपंचायत आहे. याठिकाणी भोवाडी, कुंडाचापाडा, करोळी, राउतपाडा, स्वामीनगर, नावळ्याचांपाडा आणि या सर्वांची मिळून आसे प्रमुख गाव येथे ही केंद्र शाळा आहे. यामुळे या पाड्यावरील शाळेत पहिली ते चौथी किंवा पाचवी पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी याच शाळेचा आधार असतो. मात्र, जिल्हा परिषदमधील ढासळलेली शिक्षण पद्धती, शाळा उशिरा भरणे, लवकर सुटणे, गुणवत्ता पूर्वक शिक्षण न मिळणे, यामुळे आसपासच्या गाव पाड्यातील अनेक पालकांनी आपले विद्यार्थी इतरत्र किंवा आश्रमशाळेत टाकल्यामुळे केंद्र शाळा असूनही येथील एकूण पट फक्त 56 एवढा राहिला आहे. मात्र, या शिक्षणाची आबळ इथेच थांबली नाही. या उरलेल्या 56 मधील फक्त 5 ते 6 विद्यार्थीच शाळेत येतात. बाकी विद्यार्थी आज शाळा सुरू होऊन दीड महिने झाले तरीही येतच नाही, असा गंभीर प्रकार येथे दिसून आला आहे.

5 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक
मोखाडा तालुक्यात एकीकडे शिक्षक कमतरता आहे. मात्र, आसे या केंद्र शाळेत फक्त पाच विद्यार्थी शिक्षण घेत असताना तिथे 3 शिक्षक कार्यरत आहेत. यातील एका शिक्षकाचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. मात्र, मग काही ठिकाणी पहिली ते चौथीपर्यंत वर्ग एकच शिक्षक सांभाळत असताना येथे 5 विद्यार्थ्यांना 3 शिक्षक कसे शिकवत होते? हा संशोधनाचा विषय बनला आहे.

शिक्षणाच्या बाबतीत मी अतिशय गंभीर असून ही गंभीर बाब आहे. मी मोखाडा गट शिक्षणाधिकारी यांना तात्काळ याठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या असून पट वाढवण्यासाठी प्रयत्न न करणाऱ्या शिक्षकांचा पगार बंद करा. उशीरा शाळेवर आलेल्या शिक्षकांचा निवासी भत्ता बंद करा, अशा सूचना दिलेल्या आहेत.

प्रकाश निकम, अध्यक्ष, जि.प. पालघर
Exit mobile version