341 कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा
। पनवेल । प्रतिनिधी ।
आताच्या आर्थिक वर्षामध्ये पनवेल महानगर पालिकेच्या तिजोरीत 341 कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. मालमत्ता कर हा महापालिकेचा एकमेव आर्थिक स्त्रोत असून, आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांनी मालमत्ता लवकरात लवकर भरावा, असे आवाहन करण्यात येत होते. त्याचा हा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
31 मार्च ही मालमत्ता कर भरण्याची शेवटची तारीख असल्यामुळे व मालमत्ता कराच्या शास्तीमध्ये दरमहा दोन टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात आपला मालमत्ता कर भरतात. गेल्या चार दिवसापांसून दररोज महापालिकेच्या तिजोरीत 1 कोटीहून अधिक रक्कमेची भर पडत आहे. गेल्या चार दिवसांत एकुण भरणा 5 कोटी 56 लाखांचा भरणा झाला आहे.
ऑनलाईन भरणा करण्याचे आवाहन
महापालिकेने मालमत्ताधारकांना मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘पीएमसी टॅक्स’ हा मोबाईल अॅप विकसित केला आहे. तसेच, मालमत्ताधारकांना नावामध्ये बदल करायचा असल्यास महापालिकेच्या ‘पीएमसी टॅक्स’ या मोबाईल अॅपच्या माध्यमातून करता येणार आहे. या अॅपमध्ये नाव बदलाकरता विनंती केल्यास महापालिकेकडून नाव बदलानंतर संबधितांना नोटिफिकेशन मिळणार आहे. त्याचबरोबर www. panvelmc.org या संकेतस्थळावरून मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. काही शंका असल्यास 18005320340 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त स्वरूप खारगे यांनी केले आहे.
मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाच स्त्रोत आहे. महापालिकेची विविध विकास कामे सध्या सुरु असून महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी आपला थकीत मालमत्ता कर भरून महापालिकेस सहाकार्य करावे.
स्वरूप खारगे,
सहाय्यक आयुक्त, पनवेल महानगरपालिका