श्रीसदस्यांच्या मेहनतीवर पाणी; वाहनचालकांना उन्हाचा तडाखा
। नेरळ । प्रतिनिधी ।
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाकडून शहापूर, मुरबाड, कर्जत आणि खोपोली राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्षरोपण कार्यक्रम राबवून झाडे लावण्यात आली होती. मात्र, ही झाडे महामार्गावरून गायब झालेली आहेत. त्यामुळे श्रीसदस्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले गेल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महामार्गाच्या दुभाजकांमध्ये नव्याने झाडे लावण्यात येणार होती; परंतु, प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी झाडांचा कोणताही ठावठिकाणा नाही. त्यामुळे स्थानिकांसह प्रवासी वर्गाकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यावतीने रायगड व ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुतर्फा तसेच डोंगर भागात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. काही ठिकाणची झाडे मोठी झाली असून, त्या भागात सावली निर्माण झाली आहे. त्याच धर्तीवर श्री सदस्यांकडून कर्जत-मुरबाड महार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली होती. 2018-19 दरम्यान लावलेल्या शेकडो झाडांसाठी प्रतिष्ठानच्या सदस्यांना त्यांची जोपासना करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, येथील राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने या झाडांची कत्तल केली आहे. त्यात शहापूर, मुरबाड, कर्जत आणि खालापूरमधील महामार्गाचा देखील समावेश आहे.
या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या प्रक्रियेत शेकडो झाडे तोडली गेली आहेत. मात्र, त्यांची पुन्हा लागवड करण्यात आलेली नाही. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने ही झाडे कष्टाने वाढवली होती. त्यामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले गेले आहे. त्यामुळे या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नव्याने झाडे लावण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे महामार्गाच्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यात येणार होती; परंतु, प्रत्यक्षात त्या झाडांचा कोणताही ठावठिकाणा अद्याप दिसून येत नाही. त्यामुळे स्थानिकांसह प्रवासीवर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे.
नविन झाडे लावण्याची मागणी
सध्या पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे निसर्गावर विपरीत परिणाम होत आहे. वाढते औद्योगिक प्रक्षण, उष्णतेत होणारी वाढ, ओला दुष्काळ, गारपीट, वादळे, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीची तीव्रता वाढताना दिसत आहे. याशिवाय झाडांची कमी झालेली संख्या पशुपक्ष्यांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण करत आहेत. सध्या रुंदीकरण आणि विकास महत्वाचे असले तरी झाडांची जोपासना होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने महामार्गाच्या दुतर्फा आणि दुभाजकांमध्ये नवीन झाडे लावण्याचा निर्णय त्वरित घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
विकासकामांसाठी झाडे तोडली असतील तर पुढील काळात संबंधित विभागाकडून झाडांची लागवड करण्याचा प्रयत्न वन विभाग करणार आहे.
प्रदीप चव्हाण,
वन परिक्षेत्र अधिकारी, कर्जत