पनवेलमध्ये मांसाहार प्रेमींची बाजारपेठेत गर्दी

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर मांसाहारप्रेमींनी आज पनवेलच्या बाजारपेठेत मोठी गर्दी केली. मटण खरेदीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर पनवेलच्या मच्छी मार्केटमध्येही मासे खरेदीसाठी सकाळपासूनच नागरिकांची वर्दळ पाहायला मिळाली.

गटारी अमावस्या म्हणजे श्रावण सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा मांसाहाराचा दिवस मानला जात असल्याने अनेक कुटुंबांनी मटण, चिकन आणि मासे खरेदीला पसंती दिली. त्यामुळे बाजारपेठेत नेहमीपेक्षा मोठी गर्दी झाली होती. यंदा मटण आणि मासे च्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगलीच झळ बसली. विशेषतः गावठी कोंबडीच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून आले. दर वाढले असले तरी गटारीच्या निमित्ताने मांसाहार करण्याचा उत्साह ग्राहकांमध्ये कायम होता. मच्छी मार्केटमध्ये विविध प्रकारचे मासे खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळच्या सत्रातच मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते. गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक आणि पार्किंगची समस्याही जाणवत होती. दरम्यान, उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्याने अनेक नागरिक मांसाहाराला विराम देणार आहेत. त्यामुळे आजच्या गटारी अमावस्येला मटण, चिकन आणि मासे खरेदीसाठी मोठी झुंबड उडाल्याचे चित्र पनवेलमध्ये पाहायला मिळाले.

Exit mobile version