मुरुडकडे हजारो वाहने-रस्ते जॅम; किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांच्या रांगा
| मुरुड जंजिरा | सुधीर नाझरे |
नाताळ सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुरुडला हजारो पर्यटक दाखल झालेले आहेत. मुरुड, काशीद, मुरुड, नांदगाव व ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. राजपुरी येथे जंजिरा किल्ल्याचे तिकीट काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली. राजपुरीकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी झाली. ओहोटीमुळे समुद्राचे पाणी जेट्टीला लागत नसल्याने शेकडो पर्यटक किल्ला न पाहतच परतले. रविवारी सकाळी पर्यटकांची तुफान गर्दी जेट्टीवर झाली होती. त्यातच शाळांच्या सहलीही वाढल्या आहेत. दररोज 12 गाड्या येत असल्याने जंजिरा किल्ल्यात जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती.

मुरुडला मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून ते सर्वजण नाताळ सुट्टीचा आनंद घेत आहेत. पर्यटकांनी शनिवारी सायंकाळपासून गर्दी करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू सर्व लॉजेस फुल्ल झाले. किनारी असणार्या प्रत्येक स्टॉल्सवर गर्दी पहावयास मिळत आहे.

रविवारी जंजिरा किल्ल्यावर औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर लातूर परभणी मुंबई कल्याण डोंबवली विरार दहिसर ठाणे आदी भागातील पर्यटक मोठ्या संख्येने आले होते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची मोठी गर्दी दिसत असून काही काळ वाहतूक कोंडी सुद्धा झाली. परंतु पोलिसांनी आपली भूमिका चोख बजावत असल्याने वाहतुकीस रस्ता मिळत होता. समुद्र स्नान, बोटिंग, उंटसवारी, बनाना रायडिंग आदींचा आनंद लुटताना पर्यटक दिसत होते.
व्यवसाय तेजीत
हॉटेल मधील चविष्ठ मासे खाण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे सुद्धा दिसून आले पर्यटकांची संख्या वाढल्याने प्रत्येक घटकाला स्वयंरोजगार प्राप्त झाला होता प्रत्येक तासाला वाहनांची वाढती संख्या व वाहतुक साठी रस्ता मोकळा करताना मोठी समस्या उदभवत होती. पर्यटकांमुळे आज मुख्य बाजारपेठेत सुद्धा गर्दी दिसून आली विविध वस्तू खरेदीसाठी पर्यटक बाजारपेठेत सुद्धा आले होते.
पर्यटन महोत्सव नाही
मुरुड महिला मंचाने पर्यटकांसाठी फूड फेस्टिवल चे आयोजन केले. कोकणी व सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ चवीने पर्यटकांनी घेतले. ह्यावर्षी नगपालिका आयोजित पर्यटन मोहत्सव नसल्याने पर्यटक नाराज झाले आहेत.