। पोलादपूर । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या पोलादपूर स्थानकात भर दुपारी बस गाड्या लावायला जागा नसल्याने अनेक गाड्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या राहतात तर अनेकदा त्या स्थानकात न शिरता बाहेरच्या बाहेर मार्गस्थ होत आहेत. या बसस्थानकाचे नव्याने काम करण्यात येणार असल्याने प्रवेशद्वाराच्या बाजूला नव्या शेडचे काम करण्यात आले आहे. परिणामी, स्थानक परिसरात धूळ उडत आहे. त्यातच नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाची तावदाने अद्याप काचेविनाच आहेत. त्यामुळे महिला व पुरूष प्रवाशांची कुचंबणा होत आहे. दरम्यान, स्थानिक लोकांच्या जमिनीवर या एसटी बसस्थानकाचे अतिक्रमण झाले असल्याचे वेळोवेळी जमिन मालकांच्या वारसांकडून आमसभा तसेच महसूल प्रशासनाकडे दाद मागून लक्ष वेधण्यात आले होते. नव्याने एस.टी.बसस्थानकाचे बांधकाम करण्यासाठी निविदा काढून काम सुरू केल्याने न्यायालयामध्ये संबधित मालक दाद मागण्याच्या पवित्र्यात आहेत.
प्रवासी वर्गाच्या सेवेसाठी तत्पर असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस गावागावात धावत असल्यातरी काही लांबपल्याच्या गाड्या लोकल गाड्याच्या प्रमाणात धावत आहेत. सणासुदीच्या काळात जादा गाड्या कोकण, मुंबई ठाणेकडे जातात. ग्रामीण भागात जाणार्या गाड्यांसह इतर आगाराच्या गाड्या एकाच वेळी येतात. त्यामुळे जागा अपुरी पडत आहे. यातून मार्ग काढावा, अशी मागणी प्रवाशी वर्गासह स्थानिकांकडून करण्यात येत आहे.