। मुंबई । वार्ताहर ।
एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठता तपासूनच माध्यमांनी बातमी द्यावी. बातमीला सनसनाटी स्वरुप देणे माध्यमांनी टाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने देण्यात येणार्या सन 2023-2024 च्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, सरचिटणीस प्रवीण पुरो, खजिनदार विनोद यादव आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात ज्या पत्रकारांनी, निर्भिड पत्रकारिता केली. पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. त्यांचा वारसा, परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. सध्या तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे माध्यम क्षेत्रातही मोठे बदल झाले आहेत. आता इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, आणि सोशल मीडियाने माध्यमांचे रूप पालटले आहे. आज बातम्या केवळ वृत्तपत्रांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. मोबाइलवर, सोशल मीडियावर काही सेकंदात बातम्या पोहोचतात. माध्यमांचा वेग झपाट्याने वाढला आहे. त्यातच आता माध्यम क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला असून या क्षेत्रावर ‘एआय’चा मोठा प्रभाव पडणार आहे. ‘एआय’ आपल्याला सहाय्यक ठरू शकतो, मात्र पत्रकारितेच्या मुळाशी असलेली सत्य, पारदर्शकता, आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये केवळ पत्रकारच जपू शकतात, असा विश्वासही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
माध्यम क्षेत्रात बदल होत असताना मीडिया ट्रायल सारखी आव्हानेही समोर येत आहेत. ‘मीडिया ट्रायल’मुळे समाजात संभ्रम निर्माण होतो आणि एखाद्या व्यक्तीच जीवन उद्ध्वस्त होऊ शकते, एखाद्याचे करिअर संपू शकते. माध्यमांनी सत्य, पारदर्शकता आणि नैतिकतेला महत्त्व द्यावे, तसेच चुकीच्या गोष्टीवर टीका करणे, टीपणी करणे हा माध्यमांचा हक्क आहे. सगळीकडे नकारात्मक गोष्टी घडताना चांगल्या, सकारात्मक गोष्टी सुद्धा समाजाच्या समोर येणे आवश्यक असल्याचे मतही अजित पवार यांनी व्यक्त केले.
पत्रकारांच्या विविध मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी स्वतः सकारात्मक आहोत. माध्यमकर्मींचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसंदर्भात अभ्यास करुन निर्णय घेण्यात येईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.
वार्ताहर संघाने आपल्या सदस्यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने पुरस्कार देण्याची ही बाब कौतुकास्पद असून अशारितीने आपल्याच सदस्यांचा गुणगौरव करणारा आपला एकमेव संघ असावा. यातून सर्वांना प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले.