चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल गौरव
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बॉलिवूडमध्ये ‘डिस्को डान्सर’ म्हणून ओळखले जाणारे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दि. 8 ऑक्टोबर रोजी मिथुन चक्रवर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा मानला जाणार्या दादासाहेब फाळके पुरस्काराची मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे. चित्रपटसृष्टीत अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी चित्रपटसृष्टीवर बराच काळ अधिराज्य केलं. त्यांच्या डिस्को डान्सचे चाहते तर परदेशातही आहेत. आपली संवाद शैली, नृत्य, अभिनय याच्या जोरावर त्यांनी हिंदुस्थानी चित्रपट सृष्टीत एक ओळख निर्माण केली. सोबतच देशापरदेशात हिंदी चित्रपट सृष्टीची मोहर उमटवली. यामुळे यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी 2024 मध्ये त्यांना देशातील नागरी पुरस्कातील एक पद्मभूषण पुरस्कार ही मिळाला होता. तसेच तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरही त्यांनी आपलं नाव कोरलं आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटात रामकृष्ण परमहंस यांची त्यांनी केलेली भूमिकादेखील चांगलीच गाजली होती. त्या भूमिकसाठी त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
मिथुन चक्रवर्ती यांची कारकीर्द
मिथुन यांचा जन्म 16 जून 1950 रोजी कोलकाता याठिकाणी झाला. त्यांनी बंगाली, हिंदी, तेलुगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये काम केले आहे. त्यांच्या नावावर 350हून अधिक सिनेमे आहेत. अभिनयाशिवाय त्यांनी निर्मिती क्षेत्रातही काम केले असून, सध्या मिथुन राजकारणात विशेष सक्रिय आहेत. याशिवाय त्यांनी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले असून, दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला आहे.
‘मृगया’तून पदापर्ण
1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृगया’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांच्या या पहिल्याच सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. मात्र, त्यांच्या करिअरची गाडी ‘डिस्को डान्सर’ या सिनेमामुळे रुळावर आली. त्यांनी आत्तापर्यंत ‘डिस्को डान्सर’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘हम पांच’, ‘सहस’, ‘वरदात’, ‘बॉक्सर’, ‘प्यारी बहाना’, ‘प्रेम प्रतिज्ञा’, ‘मुजरिम’ आणि ‘अग्निपथ’सारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटात काम केले आहे.