शेकाप पुरस्कृत, प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी सोहळा रंगणार
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागमधील सर्वांचेच आकर्षण असणारी शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्र मंडळाच्या वतीने एक लाख 21 हजार 111 रुपयांची दहीहंडी शेतकरी भवन समोर उभारली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी भवन येथे घेण्यात आलेल्या बैठकीत चषकाचे अनावरण माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रदीप नाईक, ॲड. गौतम पाटील, यतीन घरत, अशोक प्रधान, अक्षया नाईक यांच्यासह प्रशांत नाईक मित्रमंडळाचे पदाधिकारी, सभासद, अलिबाग शहरातील व पंचक्रोशीतील गोविंदा पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार 7 सप्टेंबरला दहीकालानिमित्त अलिबागमध्ये शेतकरी भवनसमोर प्रशांत नाईक मित्रमंडळाच्यावतीने दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहचली असून त्याची तयारी मंडळाच्या वतीने जोमाने सुरु आहे.
यावर्षी दहीहंडीच्या कार्यक्रमात अलिबाग शहरासह चेंढरे, सुडकोली, पेझारी, ढोलपाडा, नेहूली, गोंधळपाडा, मुळे, मेटपाडा, आक्षी, बहीरीचापाडा, पेढांबे, बांधण, बामणसुरे, गवळीवाडी वेश्वी, सहाणगोठी, कोळीवाडा अलिबाग, कुरुळ, मानी, किहीम आदी शहरी व ग्रामीण भागातील एकूण 50 गोविंदा पथकांनी सहभाग नोंदविला आहे. त्यात 22 महिला गोविंदा पथक व 28 पुरुष गोविंदा पथकांचा समावेश आहे. सलामीची दहीहंडी पुरुष गटासाठी पाच थरांची तर महिला गटासाठी चार थरांची असणार आहे. सलामीची दहहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला 15 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. अंतिम सामन्यात सात थरांची दहीहंडी फोडणाऱ्या पुरुष गटातील गोविंदा पथकासाठी एक लाख 21 हजार 111 रुपयाच्या बक्षीसासह गदा देऊन विजेत्या गोविंदा पथकाचा सन्मान केला जाणार आहे.
गोपाळकाळानिमित्त गेल्या अनेक वर्षापासून शेकाप पुरस्कृत, प्रशांत नाईक मित्रमंडळाच्यावतीने दहीहंडीचा सोहळा साजरा केला जात आहे. या सोहळा दिवसेंदिवस वृंध्दीगत होत आहे. दहीहंडी फोडण्यासाठी आता गोविंदा पथकांची संख्याही वाढत आहे. 11 हजार रुपयांच्या बक्षीसाने सुरु झालेला दहीहंडीचा कार्यक्रम आता लाखो बक्षीसापर्यंत पोहचल्याने अलिबागकरांसाठी व पंचक्रोशीतील गोविंदा पथकाना एक पर्वणीच ठरत आहे. यंदाही हा दहीहंडी सोहळा साजरा केला जात आहे. हा सोहळा खेळीमेळीच्या वातावरणात व आनंदाने साजरा करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रशांत नाईक – माजी नगराध्यक्ष