पहिल्या पावसात माथेरानची दैना

भूस्खलनात रस्ता खचला, घराचेही नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

। माथेरान । वार्ताहर ।

उंच शिखरावरील रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये पहिल्याच पावसात प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. फक्त दोन तास जोरदार झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे पाण्याचा निचरा न होता रस्त्यावरून वाहत जाणार्‍या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन रस्ता खचला, यामध्ये एका घराचे नुकसान झाले असून, जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

माथेरान हे 700 हेक्टरमध्ये घनदाट जंगलाने वेढलेले शहर आहे. त्यामुळे सहाजिकच येथे जोरदार पाऊस पडतोच. मात्र, यावर्षी जून महिन्याच्या 20 तारखेला दुपारी 12 वाजता अतिमुसळधार पाऊस विजांच्या कडकडाटासह बरसू लागला. दोन तास सुरू असलेल्या पावसाने पालिका प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. दि. 20 रोजी सकाळी 8.30 ते 5.30 या दरम्यान 156 मिलिमीटर पाऊस बरसला. यापैकी फक्त दोन तासात 150 मिलिमीटर इतका पाऊस झाला. या पावसाच्या पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की येथील स्थानिकांना 26 जुलै 2005 ची आठवण झाली. पालिका प्रशासनाकडून पावसाळी गटारे काढणे, बांध टाकणे ही कामे हाती घेतली होती मात्र, ती प्रत्यक्षात उतरली नसल्याने काही ठिकाणी गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत होते.

पंचवटी नगरचा भाग उतारावर असल्याने बाजारपेठेतल्या महात्मा गांधी रस्त्याचा काही भाग, छत्रपती शिवाजी नगर, राजाराम साळुंके रोड येथील पाणी हे रस्त्यावरून पंचवटी नगरमध्ये घुसले. पंचवटी नगर हे उतारावर असल्याने पाण्याचा मोठा प्रवाह तिकडे जात होता, त्यामुळे पाण्याला जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाण्याने रस्त्याच्या कठडा तोडून पाणी शेजारी असणार्‍या घरात शिरले. रस्ता खचला आणि रस्त्याचे दगड घरावर पडले आणि घराचे नुकसान झाले, मात्र या घरात कोणीही राहात नसल्याने मोठी जीवितहानी टळली. तसेच इंदिरा गांधी नगर येथे गणेश मंदिर परिसरातील घरामध्ये रस्त्यावरील पाणी शिरले. दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला बांध घातले जातात, मग यावर्षी इतका उशीर का, असा सवाल केला जातोय.

नगरपालिका प्रशासन निष्क्रिय?
या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात लाखो रुपये खर्चून तयार केलेला रस्ता खचून भूस्खलन झाले. या रस्त्याकडे पालिकेने विशेष लक्ष देऊन वेळीच बांध घातले असते तर ही दुर्घटना टळली असती, पण याकडे एकही अधिकार्‍याने आणि कर्मचार्‍याने लक्ष दिले नसल्याने लाखो रुपयांचा रस्ता पाण्यात गेला. त्यामुळे पालिका प्रशासन निष्क्रिय झाले आहे का, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
बांध घालणार कधी?
पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्यामध्ये बांध घातले जातात आणि ते पाणी गटारामध्ये सोडले जाते. याकामासाठी ठेकेदाराची नियुक्ती पालिकेकडून करण्यात आली आहे. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बांध टाकण्याचे काम पूर्णत्वास जाते. मात्र, यावर्षी जून महिन्याचे तीन आठवडे उलटूनही बांध घातले नाहीत, त्यामुळे ठेकेदार नक्की काम करतो आहे की नाही यावर नगरपालिकेचा अंकुश राहिला नाही, त्यामुळे पालिका नक्की ठेकेदारासाठी आहे की सामान्य लोकांसाठी, असे नागरिकांमधून बोलले जात आहे. त्यामुळे पालिका ठेकेदारावर कारवाई करणार का, असा सवालदेखील स्थानिकांकडून विचारला जात आहे.
आपत्ती व्यवस्थापन आहे कुठे?
पावसाळ्याच्या दिवसात कुठे ही अनुचित घटना घडू नये आणि झालीच तर त्याचे निवारण करण्यासाठी शासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाची स्वतंत्र नियुक्ती केली जाते. या अनुषंगाने माथेरान नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्ष केला आहे. यासाठी कर्मचार्‍यांची नियुक्तीदेखील केली आहे. मात्र, झालेल्या या दुर्घटनेच्या पाहणीसाठी एकही अधिकारी किंवा कर्मचारी आले नसल्याने स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी प्रकट केली असून, नगरपालिकेचे अधिकारी आणि काही कर्मचारी माथेरानमध्ये राहात नाहीत, त्यांनी या पावसाळ्यात येथेच राहावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

महात्मा गांधी रस्त्यावरील युनियन बँकेकडून पाणी वाहत छत्रपती शिवाजी महाराज नगर येथून राजाराम साळुंके रोड करत या तिन्ही भागातील पाणी पंचवटी नगरमध्ये घुसले. प्रचंड प्रवाहामुळे रस्त्याचा कठडा तोडून पाणी समोरच्या घरात घुसले. पाण्याबरोबर मोठे दगडही घरामध्ये घुसले व घराचे पार्टिशन तोडून पाणी बाहेर निघाले. हे सर्व दृश्य अगदी भयावह होते. दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली. पण, या पूर्ण दिवशी पालिकेचा एकही अधिकारी येथे भेट द्यायला आला नाही.

उमेश ढेबे, स्थानिक
Exit mobile version